पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीत भाजप 20 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेससोबतच आप, तृणमूल काँग्रेस आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्सचं कडवं आव्हान भाजपसमोर होतं. मात्र या सर्व गोष्टींवर मात करत भाजपने सत्ता काबीज केली आहे. मात्र मॅजिक फिगर गाठण्यासाठी भाजपला अपक्षांचीही मदत घ्यावी लागली आहे. सर्व अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपचं पारडं जड झालं आहे. असं असलं तरीही भाजपकडून मगोपला सोबत घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. आमदारांचा विरोध डावलून मगोपला सोबत घेण्याचं भाजपचं प्रयोजन लोकसभेची पूर्वतयारी मानली जात आहे.
मगोपच्या सुदिन ढवळीकरांनी गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेससोबत युती केली होती. मात्र तृणमूल काँग्रेसला गोव्यात आपलं खातंही खोलता आलेलं नाही, तर किंगमेकर होण्याची स्वप्न बघणाऱ्या मगोपला (MGP) अवघ्या 2 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. मगोपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. निवडणुकीआधी कुणालाही पाठिंबा देण्यापूर्वी सहयोगी तृणमूलशी चर्चा करण्याचं वक्तव्य करणाऱ्या सुदिन ढवळीकरांनी निकालादिवशीच तृणमूलची साथ सोडत भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र भाजपच्या चार आमदारांनी खुलं आव्हान देत मगोपला सोबत घेण्यास विरोध दर्शवला आहे. फोंड्याचे आमदार रवी नाईक, मॉविन गुदिन्हो, गोविंद गावडे आणि बाबूश मोन्सेरात यांनी मगोपवर निशाणा साधत त्यांच्या सत्तेतील सहभागासाठी विरोध दर्शवला आहे. मात्र भाजपच्या (BJP) स्थानिक नेत्यांनी मात्र हा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील असं सांगत आमदारांच्या तोंडाला पानं पुसल्याचं चित्र आहे. मात्र भाजपकडून ही खेळी नेमकी कशासाठी खेळली जात आहे अशी चर्चाही सुरु झाली आहे. याचं उत्तर म्हणजे भाजपने लोकसभेसाठी आतापासूनच सुरु केलेली पूर्वतयारी.
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी गुरुवारी सत्तास्थापनेसह विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तानावडेंनी आगामी लोकसभा (Loksabha) निवडणुकीत भाजप गोव्यातील दोन्ही जागांवर विजय मिळवेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच पंचायत निवडणुकीतही भाजपच बाजी मारेल असा दावाही तानावडेंनी केला आहे. मात्र यासाठी भाजपला मगोपची साथ घ्यावी लागणार असं चित्र आहे. कारण जी परिस्थिती विधानसभा निवडणुकीत होती, तीच पंचायत निवडणुकीत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसमोर स्थानिक पातळीवर भाजपला चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.