Shantadurga Kavale Jatra: “क्रुद्धौ शांती युतौ कृतौ हरिहरौ”, श्री शांतादुर्गा देवीचा जत्रोत्सव

Shri Shantadurga Temple Kavale: गोमंतकाच्या पुण्यभूमीत, अंत्रूज महालाच्या कुशीत वसलेले श्री क्षेत्र कैवल्यपूर (कवळे) हे केवळ एक देवस्थान नसून श्रद्धा, शांती, संस्कृती आणि इतिहास यांचा जिवंत संगम आहे.
Shri Shantadurga Temple Kavale
Shri Shantadurga Temple KavaleDainik Gomantak
Published on
Updated on

गोमंतकाच्या पुण्यभूमीत, अंत्रूज महालाच्या कुशीत वसलेले श्री क्षेत्र कैवल्यपूर (कवळे) हे केवळ एक देवस्थान नसून श्रद्धा, शांती, संस्कृती आणि इतिहास यांचा जिवंत संगम आहे. निसर्गसौंदर्याने नटलेले हे क्षेत्र जणू देवीच्या चरणस्पर्शानेच पवित्र झाले आहे, अशी अनुभूती येथे पाऊल टाकताच प्रत्येक भाविकाच्या मनात दाटून येते.

कवळे येथील श्री शांतादुर्गा देवीचे भव्य देवालय हे गोमंतकातील वैभवशाली मंदिरांंपैकी एक मानले जाते. पूर्वाभिमुख असलेले हे देवालय, त्याभोवती असलेल्या प्रशस्त अग्रशाळा, समोरील दीपस्तंभ, प्राकाराखालील तलाव आणि नगारखान्यातून घुमणारा चौघड्याचा नाद, या सर्वांमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो.

देवालयाच्या गर्भगृहावर उभारलेले उंच व भव्य घूड व त्यावरील सुवर्ण कलश हे गोमंतकातील देवालय वैशिष्ट्यांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. श्री मंगेशाचा दीपस्तंभ, श्री महालक्ष्मीचा चौक आणि श्री शांतादुर्गेचे घूड हे केवळ स्थापत्य वैभव नसून गोमंतकाच्या धार्मिक अस्‍मितेचे प्रतीक आहे.

या भव्य देवालयाच्या उभारणीमागे सरदार नारोराम शेणवी रेगे (मंत्री) यांची अपार श्रद्धा आणि देवीवरील अढळ विश्वास होता. कोल्हापूर येथील करवीर संस्‍थानात मंत्रिपद लाभल्यानंतर, “हे सर्व वैभव देवीच्या कृपेनेच प्राप्त झाले” या भावनेतून त्यांनी इ.स. १७३० च्या सुमारास स्वखर्चाने देवालयाच्या बांधकामास प्रारंभ केला. महाजनांच्या सहकार्याने उभे राहिलेले हे देवालय आजही देवीच्या कृपेचे आणि भक्तांच्या निष्ठेचे भव्य स्मारक म्हणून उभे आहे.

देवालयाच्या गर्भगृहात विराजमान असलेली चतुर्भुज पंचलवी श्री शांतादुर्गा देवीची मूर्ती भक्तांच्या अंतःकरणात शांतीचा दीप प्रज्वलित करते.

एका हातात भगवान शिव आणि दुसऱ्या हातात भगवान विष्णू धारण केलेली ही मूर्ती हरिहर ऐक्याचे प्रतीक असून, “क्रुद्धौ शांती युतौ कृतौ हरिहरौ” या तत्त्वाचा साकार अनुभव येथे मिळतो.

देवस्थानातील प्रसाद किंवा सिंह पट्टा हा भाविकांसाठी विशेष श्रद्धेचा विषय आहे. या पट्ट्यावर प्रसाद जुजा लावून श्री देवीकडे प्रार्थना करून प्रसाद कौल घेतात. ती प्रसादपूजा तांबड पटकुळीच्या फुलांच्या पाकळ्यांची लावली जाते. कोणतेही शुभकार्य, महत्त्वाचा निर्णय किंवा नवीन उपक्रम देवीच्या प्रसाद कौलाशिवाय पूर्ण मानला जात नाही.

ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि निष्ठेने जपली जाते. देवालय परिसरात श्री नारायण देव, श्री गणपती, वीर भगवती, श्री क्षेत्रपाल, म्हारावाची शीला तसेच पारिजात वृक्ष ही पावन स्थळे असून, ती गोमंतकातील लोकश्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाची साक्ष देतात.

श्री नारोराम मंत्री व त्यांचे वंशज यांना देवस्थानात धर्मगुरूंनंतर मानाचे स्थान लाभले आहे. त्यांच्या सेवाभावामुळे, दानशीलतेमुळे आणि देवीवरील अपार निष्ठेमुळेच श्री शांतादुर्गा देवस्थानाने वैभवाचे शिखर गाठले आहे. ‘मंत्र्यांचा खांब’ आजही त्यांच्या योगदानाची आठवण करून देतो.

सरदार नारोराम मंत्रीप्रमाणेच सरदार रामचंद्र मल्हार सुखठणकर उर्फ रामचंद्र बाबा शेणवाई यांनीदेखील ती शांतादुर्गा देवस्थानात संपत्ती अर्पण केली. श्री शांतादुर्गा देवीचे देवालय आज जे मोठ्या वैभवात फोंडा तालुक्याच्या कवळे गावात आहे, ते प्राचीनकाळी इ. सनाच्या सोळाव्या शतकाच्या मध्यापूर्वी सासष्टी तालुक्याच्या केळोशी गावात होते.

श्री शांतादुर्गा दैवत केळोशीस असताना तेथे श्री सांतेरी देवी किंवा श्री सांतेर या नावाने प्रसिद्ध होते. हे तत्कालीन ऐतिहासिक पुराव्यावरून सिद्ध होते. इ.स. १५६७ साली पोर्तुगीज भाषेत लिहिण्यात आलेल्या 'फोराल दे सालसेत' या हस्तलिखितामध्ये श्री शांतादुर्गा देवीस 'सांतेरी' म्हटलेले आढळते.

हे खरे असले, तरी तत्कालीन सुसंस्कृतइसम श्री देवीचा उल्लेख करताना ‘श्री शांतादुर्गा’ म्हणत, हे संतकवी कृष्णदास शामाने रचलेल्या श्री कृष्णचरित्र कथा, अध्याय १९ वा ओवी २४८ वरील उल्लेखावरून दिसून येते. इतिहासाच्या प्रवाहात देवीचा प्रवास केळोशीहून कवळेपर्यंत झाला; पण भक्तांची निष्ठा, श्रद्धा आणि प्रेम कधीही ढळले नाही.

कुळाव्यांनी सर्वस्वाचा त्याग करून देवीसह अघनाशिनी नदी ओलांडली—हा केवळ स्थलांतराचा प्रवास नव्हता, तर श्रद्धेच्या विजयाचा अध्याय होता. या देवस्थानचे महाजन कौशिकी, वत्स, भारद्वाज या गोत्राचे आहेत.

श्री शांतादुर्गा संस्थानात श्री रामनवमी, वसंत पूजा, अक्षय्य तृतिया, श्रीलक्ष्मीनारायण प्रतिष्ठोत्सव, नागपंचमी, मुक्ताभरणी व अनंत व्रतोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, कोजागिरी, दीपावली, तुलसी विवाह, कालोत्सव, आवळी भोजन, नौकारोहण, पालखी व लालखी उत्सव, जत्रोत्सव, खांद्यावरील रथ लालखी उत्सव, नौकारोहणोत्सव, सार्वजनिक महारुद्र, नित्यपूजा, पालखी उत्सव, महाशिवरात्री रथोत्सव शिमगोत्सव आदी उत्सव भक्तिभावाने साजरे केले जातात.

श्री शांतादुर्गा देवीचा जत्रोत्सव माघ शुक्ल प्रतिपदेपासून शुक्ल षष्ठीपर्यंत साजरा होतो. या काळात मोठी यात्रा भरते आणि जत्रोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शांतादुर्गा देवीचा पालखी उत्सव.

गोव्यात प्रथमच १९७६ साली उत्थापन करण्यात आलेल्या देवीच्या सुवर्ण पालखीचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. केळोशीकरांच्या प्रत्येक कुटुंबातून किमान एक सदस्य आवर्जून उपस्थित राहतो. श्री मंगेश देवस्थानासह इतर देवालयांचे महाजनही या उत्सवात सहभागी होतात.

माघ शुद्ध पंचमी हा महापर्वणीचा दिवस मानला जातो. केळोशीकर कुटुंबांमध्ये श्रावण, आश्विन, मार्गशीर्ष आणि माघ या चार महिन्यांतील शुक्ल पंचमीला विशेष धार्मिक परंपरा पाळली जाते. माघ शुक्ल षष्ठीच्या पहाटे महारथातून श्री शांतादुर्गेची भव्य मिरवणूक निघून जत्रोत्सवाची सांगता होते.

मिरवणुकीपूर्वी रथावर नारळ फोडण्याचा मान परंपरेनुसार प्रथम श्री गौडपादाचार्य कैवल्यपूर मठाधीशांचा असून, त्यानंतर बुर्ये उपनावाच्या वैष्णव सारस्वत ब्राह्मणांचा आणि पुढे कुशस्थळीकर श्री मंगेश देवाचे कुळावी व इतर भाविकांचा असतो.

या देवस्थानात दर महिन्याच्या शुक्ल व वद्य पंचमीस नित्युत्सव साजरा केला जातो. त्या दिवशी रात्री पुराण-कीर्तनानंतर श्री देवीची पालखी मिरवणूक निघते. पंचमीच्या दिवशी देवस्थानात आलेल्या महाजनांनी उत्सव पूर्ण केल्याशिवाय बाहेर जाऊ नये, अशी परंपरा आहे. अपरिहार्य कारण असल्यास देवीसमोर नारळ अर्पण करून विनंती प्रार्थना केल्यानंतरच जाण्याची प्रथा आहे.

श्री शांतादुर्गा देवस्थानातील दैनंदिन पूजा, विधी आणि धार्मिक व्यवस्था ही शिस्तबद्ध परंपरेवर आधारलेली आहे. सरज्योतिषी आणि पेंडसे हे दोन अभिषेकी पुरोहित म्हणून देवस्थानातील दैवकृत्ये पाहतात.

महाजनांची घराणी या दोन्ही अभिषेकींमध्ये विभागलेली असून, प्रत्येक महाजन आपल्या नियोजित पुरोहितामार्फतच श्री संस्थानातील धार्मिक विधी पार पाडतो.

Shri Shantadurga Temple Kavale
Bodgeshwar Jatra: "पूर्वी म्हापशात जत्रेचा फलक पाठीवर घेऊन, ढोल-ताशा वाजवत दवंडी पिटली जायची"; बोडगेश्वर जत्रेचा इतिहास

गर्भगृहातील नित्य व्यवस्थेसाठी चार पैरीकर पुजाऱ्यांची योजना असून, प्रत्येक पंधरवड्याला एक याप्रमाणे रेगे, साधले, दुभाषी आणि गायतोंडे ही घराणी अनुक्रमे ही जबाबदारी सांभाळतात. श्री लक्ष्मीनारायण व अन्य परिवार देवतांच्या पूजेची सेवा पावसे घराण्याकडे असून, श्रींच्या गर्भगृहातील नंदादीप, तेलाचे दिवे आणि दिव्यांची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवण्याची जबाबदारी स्वतंत्रपणे जोतकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

Shri Shantadurga Temple Kavale
Mayem: ‘माले’ पेटले, देवीचा ‘पण’ही पूर्ण! मयेतील ‘माल्या’ची जत्रा उत्साहात, ‘चव्हाटा’ ठिकाणी ‘पेठ’ जाण्याच्या परंपरेत खंड

सध्या जोतकर आणि जाण ही दोन व्यक्ती पैरी पद्धतीने ही सेवा पार पाडत असून, या सर्व व्यवस्थांमधून देवस्थानातील धार्मिक शिस्त, सेवाभाव आणि परंपरेचा अखंड वारसा आजही जिवंत राहिला आहे.

श्री शांतादुर्गा देवी ही केवळ कुलदेवता नसून ती शांती, समन्वय, करुणा आणि ऐक्याची अधिष्ठात्री शक्ती आहे. श्री क्षेत्र कैवल्यपूर हे श्रद्धेचा दीपस्तंभ असून, श्री शांतादुर्गा देवस्थान हे गोमंतकाच्या आत्म्याचे तेजस्वी आणि पवित्र प्रतिबिंब आहे.

- वल्लभ वासुदेव कुडचडकर, अध्यक्ष

- श्री. शैलेश दुर्गानंद शेणवी सावर्डेकर, सचिव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com