Margao Dindi Utsav: मडगावचा दिंडी महोत्सव, गोमंतकातील एक धार्मिक भूषण

Dindi Utsav Goa 2025: चाळीतील एका खोलीत एक मारवाडी व्यापारी गोपाळ शेट नावाचे गृहस्थ रहायचे. व्यापाऱ्यांमधील वादविवाद पाहून गोपाळ शेट यांनी एक नामी शक्कल लढवली.
Margao Dindi Utsav
Margao Dindi UtsavDainik Gomantak
Published on
Updated on

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला गोव्याबाहेरून आलेली व्यापारी मंडळी मडगाव शहरात स्थायिक झाली. हळूहळू ही मंडळी शांबा लोटलीकर चाळीत आपापले काम आटोपून रात्रौ एकत्र येऊन गप्पाटप्पा, चर्चा करायचे. कधीकधी चर्चा करता करता हमरीतुमरीवर येत असत.

चाळीतील एका खोलीत एक मारवाडी व्यापारी गोपाळ शेट नावाचे गृहस्थ रहायचे. व्यापाऱ्यांमधील वादविवाद पाहून गोपाळ शेट यांनी एक नामी शक्कल लढवली.

त्यांनी सर्वांसमोर एक प्रस्ताव ठेवला की, वादविवादाच्या फंदात न पडता गप्पाटप्पा चर्चा करण्याऐवजी भगवंताचे नामस्मरण, भजन करायचे. त्यातून देवभक्ती वाढीस लागेल, सुसंवाद वाढेल. सगळ्यांनी त्यांची उत्तम अशी संकल्पना उचलून धरली.

यातील काही व्यापारी विठ्ठल भक्त तथा वारकरी संप्रदायातील होते. झाले, सर्वांच्या अनुमतीने त्यांनी पंढरपूरचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीचे तैलचित्र लोटलीकर चाळीतील एका खोलीत ठेवून दररोज संध्याकाळी नामजप, नामस्मरण व भजनाद्वारे भक्तिरसात रममाण होऊन त्यांच्यातील मतभेद दूर झाले. १९०९ साली त्या स्थानाला हरिमंदिर असे नामकरण करण्यात आले.

मठग्राम नगरीला ‘येथेच माझी पंढरी’ हे सूत्र धरून आषाढ आणि कार्तिकी एकादशीला नामवंत भजनी कलाकार आणि प्रसिद्ध हरदासाची कीर्तन सेवा होऊ लागल्या. हळूहळू मडगावातील भक्त मंडळी त्यांच्यात मिसळून गेली.

पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीत गोमंतकातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी पारपत्रची (पासपोर्ट) सक्ती असायची. त्यामुळे व्यापारी वारकऱ्यांना पंढरीच्या वारीला जाता येत नव्हते. त्या काळात मठग्राम नगरीत अवघीच मंदिरे होती.

त्यात मडगावकरांचे ग्रामदैवत दामोदराचे साल होते. मडगावातील कोंब वाड्यावर असलेले केसरकर यांच्या घरात विठ्ठल रखुमाई दैवतांची स्थापना करण्यात आली होती. १९०९ साली सर्वप्रथम आषाढ मासातील त्रयोदशी तिथीच्या दिवशी विठ्ठल रखुमाईचा पहिला पार (दिंडी पालखी) टाळ मृदंग व विठ्ठल नामात श्री हरिमंदिरातून निघून दामोदर सालात भेट देत केसरकर वाड्यात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी दैवतांची भेट घेऊन पार दुसऱ्या दिवशी सकाळी परत हरिमंदिरात आला.

तेव्हापासून दिंडी उत्सवाची सुरवात झाली असे म्हणतात. पण आषाढ मासातील पावसाच्या जबरदस्त माऱ्यामुळे सर्व वारकरी व भक्त मंडळी चिंब भिजून गेली. अशी अडचण पुन्हा येऊ नये म्हणून आषाढीऐवजी कार्तिकी त्रयोदशीला निघू लागली.

जुन्या काळातील मंडळी सांगायचे की, वारकरी भक्तांनी पंढरपूर वारी करायची असे ठरवून आषाढ महिन्यात प्रवासाला सुरवात केली, पण पोर्तुगीज जुलमी राजवटीतील अधिकाऱ्यांनी त्यांना गोव्याच्या सीमेवर अडवून ठेवले.

ते परत आले तो दिवस होता त्रयोदशी. म्हणून मुख्य दिंडी उत्सव त्रयोदशी तिथीला सुरवात झाली. पूर्वीच्या काळी महाराष्ट्र राज्यातील नामवंत हरदासाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत. सुप्रसिद्ध कीर्तनकार निजामपूरकर बुवांपासून घागबुवा, मकरंद रामदासी असे दिग्गज हरदासाचे कीर्तनाचे कार्यक्रम व्हायचे. त्याच बरोबर गोव्याबाहेरून नामवंत गायकांना आमंत्रित करण्यात येत असे.

लोटलीकर चाळीतील श्री हरिमंदिर देवस्थान २०१७ सालापर्यंत कार्यरत होते. आदर्श वनिता विद्यालयासमोर असलेल्या श्री हरिमंदिराच्या स्वतःच्या जागेत २०१८ साली अवघ्या दोन वर्षांत नूतन मंदिर बांधून पूर्ण झाले.

श्री शालीवाहन शके १९४० विलंब नाम संवत्सर वैशाख शुद्ध पंचमी, शुक्रवार, दि. २० एप्रिल २०१८ रोजी सकाळी ८.४६ मि. या शुभमुहूर्तावर चिन्मय मिशनचे मडगाव केंद्राचे तत्कालीन प. पू. स्वामी निखिलानंद सरस्वतीजी यांच्या शुभ हस्ते नूतन वास्तू उद्घाटन व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा पार पडला.

लोटलीकर चाळीतील जुन्या मंदिरातील मूर्ती नवीन मंदिरात आणून ठेवल्या आहेत व जुन्या वास्तूचा ताबा मूळ मालकाला सुपूर्द करण्यात आला.

हल्ली या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हा दिंडी महोत्सव ७ दिवस कार्तिक अष्टमीला सुरवात होऊन कार्तिक चतुर्दशीला समारोप होत असतो. या ७ दिवस दररोज शालेय विद्यार्थी व महिलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धांबरोबर भजन व कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात.

दिंडी महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, दिंडी फक्त सांस्कृतिक कार्यक्रमापुरती मर्यादित नसून धार्मिक कार्यक्रमाचे विधान असते.

Margao Dindi Utsav
Dindi Utsav : 1909 साली गोव्यात पोर्तुगीज राजवट होती, लोटलीकर चाळीत मंदिराची स्थापना करण्यात आली; 'दिंडी उत्सवा'चे बदलते रुप

कार्तिक त्रयोदशी दिवशी श्री हरिमंदिरात जतन करून ठेवलेल्या शेकडो वर्षांपासूनच्या जुन्या काळातील देवांचे ग्रंथ, पोथ्या व वीणेचे यथोचित भक्तीभावाने पूजन करून उत्सव मूर्तींसह श्रींच्या पालखी रथामध्ये स्थापना करून श्रींचा रथ वारकरी व दिंडी पथकासह टाळ मृदंगाच्या गजरात मठग्राम नगर प्रदक्षिणेला निघून दुसऱ्या दिवशी म्हणजे या कार्तिक चतुर्दशीला श्रींचा पालखी रथ परत श्री हरिमंदिरात पोचल्यावर गौळण काला व बाल गोपाळांच्या उपस्थितीत दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडतो.

Margao Dindi Utsav
Margao Dindi Mahotsav: विठ्ठल विठ्ठल!मडगावात 116 व्या दिंडी उत्सवास प्रारंभ; मंत्री कामत यांच्या हस्ते समई प्रज्वलन

तर संध्याकाळी गायनाचा कार्यक्रम झाल्यावर दिंडी महोत्सवाची उत्साहात सांगता होते. गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने राज्यातील एकूण ११ मंदिरांची पर्यटन प्रमोशनसाठी निवड केली असून त्यात श्री हरिमंदिराचा समावेश आहे. पर्यटन खात्यातर्फे अनेक सुविधा निर्माण करण्यासंदर्भात हल्लीच देवस्थान समित्यांकडे एक बैठक घेण्यात आली.

या ७ दिवसीय महोत्सवाची राज्य शासनाने दखल घेत यंदापासून या दिंडी महोत्सवाला गोवा सरकारमान्य राज्य दिंडी महोत्सव म्हणून जाहीर केला आहे. त्याबद्दल सरकारचे शतशः आभार. सर्व मडगावकरांना किंबहुना समस्त विठ्ठल भक्तांना दिंडी महोत्सवच्या शुभेच्छा.

- मनोहर बोरकर

सचिव, श्री हरिमंदिर देवस्थान समिती, मडगाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com