Tribal Festival: पर्यटकांना 'वेगळ्या' गोव्याची ओळख करून देऊ शकणारे व्यासपीठ, समृद्ध 'आदिवासी महोत्सव'

Quepem Tribal Festival: केपेतील कोपेलाभाटमधील ती मोकळी जागा गोव्याच्या पारंपरिक गावाच्या एक लहान प्रतिकृतीत रूपांतरित झाली होती.
Quepem Tribal Festival, केपे आदिवासी महोत्सव
Quepem Tribal Festival, केपे आदिवासी महोत्सव Dainik Gomantak
Published on
Updated on

वृथा करमली

गेल्या आठवड्यात केपेचा स्थानिक आदिवासी समुदाय आपल्या संस्कृतीच्या सन्मानार्थ एकत्र आला होता. केपेच्या आदिवासी संघटनेने आयोजित केलेल्या या उत्सवात स्थानिक प्रथा, परंपरा आणि कलात्मकता यांचे देखणे दर्शन घडले. या उत्सवाला भेट देताना मला जाणवले की असे उत्सव स्थानिक समुदायांना उन्नत करण्यासाठी, आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल आपल्याला अधिक जागरूक बनण्यासाठी, शाश्वतेचा पुरस्कार व्हावा यासाठी आणि पर्यटकांना गोव्याच्या वेगळ्या अंगाची ओळख करून देण्यासाठी एक शक्तिशाली व्यासपीठ बनू शकतात.

केपेतील कोपेलाभाटमधील ती मोकळी जागा गोव्याच्या पारंपरिक गावाच्या एक लहान प्रतिकृतीत रूपांतरित झाली होती. स्थानिक व्यवसाय करणारे तिथले स्टॉल सांस्कृतिक देवाण- घेवाणीचे माध्यम बनले होते आणि गोव्याच्या वारशात रुजलेले ज्ञान तिथे संपन्नपणे प्रदर्शित होत होते. 

पाककृती कोणत्याही संस्कृतीचा महत्त्वाचा पैलू असतात. गोव्याच्या वैविध्यपूर्ण पाककला परंपरांचे प्रात्यक्षिक घडवताना विशिष्ट पद्धतीने चमकदार लाल कुणबी साड्या परिधान केलेल्या महिला पिनाग्र, दोणे, पातोळ्या, सोजी असे विविध प्रकारचे स्वादिष्ट अन्नपदार्थ पानात वाढत होत्या.‌ या पाककलांची रेसिपी आणि त्याबद्दलच्या वेधक कथा साऱ्याजणी उत्साहाने सांगत होत्या. त्या कालातीत पाककृती गोव्याच्या अन्नविषयक समृद्ध वारशाचे जणू उदाहरणच होत्या. 

Quepem Tribal Festival, केपे आदिवासी महोत्सव
Goa Folk Art: गोव्याची लोककला 'तरुणांनी' आपणहून स्वीकारायला हवी; कुंकळ्ळीच्या कलाकाराची आर्त हाक

हस्तकलांचे स्टॉल आदिवासी समुदायांची कारागिरी आणि तंत्र कौशल्याची साक्ष देणारे होते.‌ त्यापैकी बहुतेक वस्तू स्थानिक साहित्यापासून बनवल्या गेल्या होत्या. शाश्वत पद्धतीने जगण्याचा आणि निसर्गाशी जोडलेल्या जीवनशैलीची साक्ष त्यातून मिळत होती. पिढ्यान पिढ्या घरगुती उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधेही तिथे होती. 

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या उत्सवात असलेला तरुणांचा सक्रिय सहभाग हा या उत्सवाचा एक हृदयस्पर्शी पैलू होता. पाहुण्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि पारंपारिक वस्तूंचे महत्त्व समजावून देण्यासाठी अनेक तरुण तिथे वावरत होते.

Quepem Tribal Festival, केपे आदिवासी महोत्सव
Tribal Festival: केपे येथे आजपासून 'आदिवासी उत्सव', मंत्री फळदेसाईंच्या हस्ते होणार उद्‍घाटन

हा उत्सव केवळ गोव्याची परंपरा सांगत नव्हता तर त्याचे संरक्षण करून भावी पिढ्यापर्यंत ते पोहोचवण्याच्या मार्गाचेही निदर्शन करत होता. गोव्याच्या सांस्कृतिक पैलूंबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करणारा हा समृद्ध उत्सव होता.

गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणारे अशाप्रकारचे उत्सव खरे तर राज्यभर आयोजित व्हायला हवेत.  त्यातून स्थानिक समुदायांची कलात्मकता इतरांपर्यंत पोहोचेल तसेच आर्थिकरित्याही स्थानिकांना सशक्त बनवण्यास त्याची मदत होऊ शकेल आणि पर्यटनाच्या दृष्टीने तर त्याचा फायदा अतुलनीय असाच असेल. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com