
कुंभारजुवे: पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेला गोवा फक्त समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध नाही, तर इथल्या परंपरा आणि उत्सवांसाठीही तेवढाच प्रसिद्ध आहे. असाच एक आगळावेगळा उत्सव म्हणजे कुंभारजुवेतील सांगोडोत्सव. श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवीच्या गणेशोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग असलेला हा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात सुरु झालाय. मंगळवारी (२ सप्टेंबर) मांडवी नदीच्या पात्रात सजवलेल्या होड्यांवर देखावे सादर झाले आणि आता तर स्थानिक कलाकारांनी उभारलेल्या कलाकृती पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत.
कुंभारजुवे गावचा सांगोडोत्सव म्हणजे फक्त होड्यांची सजावट नाही, तर तो स्थानिक कलाकारांच्या कल्पकतेचा आणि मेहनतीचा आविष्कार आहे. यावर्षी, कुंभारजुवेच्या मच्छिमार बांधवांनी नारळाच्या झावळ्या, रंगीबेरंगी फुले आणि दिव्यांनी छोट्या होड्या सजवल्या. त्यावर पौराणिक कथा, सामाजिक विषय आणि ऐतिहासिक घटनांवर आधारित देखावे मांडले. पैकी 'महादेवाचा शरभ अवतार' बराच गाजला.
अलीकडेच छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित जीवनपट 'छावा' यावर साकारलेल्या देखाव्याने नदीपात्राला एक वेगळीच शोभा आणली. आणि मजेशीर बाब म्हणजे या सगळ्यांमध्ये चर्चेत राहिला तो 'खुनी हनिमून'चा देखावा. गावातल्या कलाकारांनी समाजात घडणाऱ्या गोष्टी किती बारकाईने टिपल्या आहेत, हे यातून दिसले.
स्थानिक कलाकार, महिला, पुरुष आणि लहान मुलांनी या देखाव्यांतून जीव ओतून काम केले. त्यांचे नृत्य, गाणी आणि नाट्यमय सादरीकरण पाहून नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर जमलेली गर्दी उत्साहाने थक्क झाली होती.
हा उत्सव शेकडो वर्षांपासून सुरू आहे. दरवर्षी गणपती बाप्पाच्या आगमनानंतर, हे छोटे चित्ररथ बनवण्यासाठी आमचे कलाकार अनेक दिवस रात्र-दिवस काम करतात. मासेमारी करणारा समुदाय ही परंपरा जपतो.
पुढील वर्षी मासेमारी चांगली व्हावी म्हणून इथे स्थानिक मच्छीमारी समुदाय होड्यांची पूजा करतो आणि त्यांना सजवतो. या उत्सवाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. पण, हे फक्त व्हिडीओ नाहीत, तर गोव्याची संस्कृती आणि इथल्या माणसांची कला म्हणावी लागते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.