पेडणे महाल हा गोव्याच्या वायव्य व उत्तर भागातला तालुका आहे. हा तालुका महाराष्ट्राला लागून असल्याने तळकोकणातील कोकणी संस्कृतीचा या भागावर खोलवर प्रभाव आहे. नव्याकोऱ्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे हा तालुका आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशझोतात आलेला आहे. पश्चिमेकडील एकाहून एक नयनरम्य व पर्यटनदृष्ट्या सरस अशा पांढऱ्याशुभ्र वाळूच्या समुद्रकिनाऱ्यांमुळे हा तालुका सुप्रसिध्द आहे.
हा तालुका आणखी एका धार्मिक-सांस्कृतिक कारणांसाठी संपूर्ण गोव्यात व शेजारील राज्यात प्रसिद्ध आहे तो म्हणजे पेडणेचा दसरोत्सव. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते पोर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात, विधींची, कार्यक्रमांची व मनोरंजनाची रेलचेल असते.
छत्रपती भोसलेंच्या घराण्याशी संबंधित असलेल्या सावंतवाडीच्या सावंत भोसले घराण्याच्या पदरी पूर्वी हे घराणे देशप्रभू म्हणून महसूल संकलन व या प्रदेशाचे एकूण लोकप्रशासन आपल्या अधिपत्याखाली चालवण्याचे कर्तव्य करत होते. पोर्तुगीजांनी या प्रदेशावर आपला हक्क सांगितल्यावर व त्यांच्याशी आपले सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित केल्यावर या राजवटीने त्यांना Viscount De Pernem ही पदवी बहाल केली. देशप्रभू घराणे या संपूर्ण पेडणे तालुक्याचे जमीनदार आहेत व आजही तालुक्यातील बहुतांश जमिनींची मालकी ही याच घराण्याकडे आहे. पेडणे शहराला टेकून देशप्रभु घराण्याचा भव्यदिव्य असा राजनिवास आहे. या वास्तुला 'दरबार' असेही संबोधले जाते.
श्री भगवती रवळनाथ तद्नुषांगिक देवस्थानात अंतर्भूत असलेले श्री रवळनाथ मंदिर हे संपूर्ण पेडणे तालुक्यातील "म्हाल देव" अर्थात मुख्य देव तसेच श्री मुळवीर हे दैवत समग्र पेडणे तालुक्याचा अधिपती म्हणून ओळखले जाते.
शहराच्या मध्यवर्ती भागात पुरातन अशा मंदिरात श्री भगवती देवी ही अष्टभुजा स्वरूपात पुर्वस्थापित आहे. पेडणेचा दसरोत्सव हा श्री भगवती व श्री रवळनाथ यांचा उत्सव मानला जातो. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे येत्या नवीन वर्षात फेब्रुवारी २०२५मध्ये सुमारे आठशे वर्षांनंतर श्री रवळनाथ देवाच्या मुर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात येणारे आहे व हा महासोहळा अविस्मरणीय असेल यात शंका नाही. या भगवती रवळनाथ व तद्नुषांगिक देवस्थानात पंचारतीपेक्षा धुपारतीला अधिक महत्त्व आहे.
हे देवस्थान १९०२ साली म्हणजेच १२२ वर्षांपूर्वी पोर्तुगीज सरकारदरबारी नोंद केलेले आहे. या देवस्थानात सावळ देसाई व कुटुंबीय, भिरोंडकर नाईक देसाई व कुटुंबीय, कोळसकर प्रभू देसाई व कुटुंबीय, शेणवी देसाई व कुटुंबीय, गोरख नाईक देसाई व कुटुंबीय, नानेरकर प्रभुदेसाई व कुटुंबीय व देशप्रभू कुटुंबीय असे ७ अधिकृत वांगड वा सात महाजनांचे गट आहेत.
संपूर्ण पेडणे तालुका तसेच तालुक्याबाहेर वा राज्याबाहेर नोकरीवर व्यवसायानिमित्त वास्तव्य करून असलेले पेडणे तालुक्यातील मूळ रहिवासी या दसरा व पोर्णिमेच्या उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतात.
"आमचे हे देव चंद्रवंशी आहेत" ही बाब महाजन मंडळी नम्रपणे नमूद करतात. 'चंद्रवंशी' या विशेषणाचा भावार्थ असा की मिरवणूक व कौल हे मंदिराबाहेर होणारे कार्यक्रम चंद्राच्या रात्रीच्या शीतल प्रकाशात पार पाडतात. पण रात्रीच्या चंद्रप्रकाशात हे उत्सव साजरे करण्याचे कारण परकीय आक्रमक वा पोर्तुगीज शासक अजिबात नाही हेदेखील महाजन मंडळी स्पष्टपणे नमूद करतात.
अश्विन शुद्ध प्रतिपदेला सकाळी देवीचं नवरात्र देवीच्या म्हाऊसवाडा येथे आदिस्थानी अर्थात 'आदिस्थान मांगर' या ठिकाणी बसतं. सकाळी आठ वाजता घटाची षोडशोपचार पूजा करून घटस्थापना होते. नंतर दुपारी ठीक बारा वाजता शहराच्या मध्यवर्ती बाजारात असलेल्या श्री भगवती मंदिरात षोडशोपचार पूजा होऊन घटस्थापना होते.
मग सामुहिक गाऱ्हाणे सांगून त्यादिवशीचा कार्यक्रम संपतो. नवरात्रीचे नऊही दिवस नित्यपूजा, अभिषेक, महानैवेद्य, अग्रशाळेत महाप्रसाद, सायंकाळी ठीक ०७:३० वाजता पुराण, आठ वाजता पालखी, नऊ वाजता किर्तन हे असे धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम नवमीच्या दहा वाजताच्या किर्तनाचा अपवाद वगळता चालू असतात. नवमीला मध्यरात्री बारा वाजता हर हर महादेव असा गजर होतो व दसरोत्सवाला अधिकृतपणे शुभारंभ होतो.
दसऱ्याच्या दिवशी सकाळी दुपारी ठीक बारा वाजता घटस्थापना झालेल्या घटाचे विसर्जन अर्थात उत्थापन होते व त्यानंतर सामुदायिक गाऱ्हाणे सांगितले जाते. संध्याकाळी पाच वाजता आपट्याच्या झाडाची पूजा करून सोने लूटले जाते तसेच पहिल्या प्रथम आपट्याच्या रूपातील सोने देवाला अर्पण केले जाते.
रात्री नऊ वाजता 'आदिस्थान मांगर' येथे भाविक 'चिरां' अर्थात एक किंवा दोन अशी लुगडी देवीला अर्पण करण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावतात. हा विधी गाऱ्हाणे सांगून केलेला नवस फेडण्यासाठी म्हणून असतो.
रात्री ११वाजल्यानंतर श्री रवळनाथाच्या मंदिरात तरंग नेसवायचा विधी सुरू होतो. ही तरंगे भूतनाथ व रवळनाथ देवाची असतात व नेसवण्यासाठीची लुगडी अर्थात 'चिरां' ही वापरलेली असावी असा दंडक आहे. ही वापरलेली लुगडी आणणारा सेवेकरी म्हणजे मडवळ (धोबी वा परीट) होय. तो गेल्यावर्षी तरंग नेसवायला वापरलेली लुगडी 'खळ' घालून घेऊन येतो व तरंगे नेसवायचा कार्यक्रम सुरू होतो.
रात्री ११ वाजता हा नेसवण्याचा विधी सुरू होऊन पहाटे चारपर्यंत चालतो व दोन्ही देवांची तरंगे पाच वाजता नेसून तयार केली जातात. रवळनाथाच्या देवळात तरंगांची पहिली पूजा होते व तरंगे पुढच्या मिरवणूकीसाठी सज्ज केली जातात या सर्व कार्यक्रमात पेडणेकर घराण्याचे प्रसिद्ध वाद्यवृंद वातावरणनिर्मिती करण्यात कोणतीही कसर सोडत नाही व आश्विन शुद्ध प्रतिपदा ते कोजागिरी पोर्णिमा या संपूर्ण उत्सवाचा भाग म्हणून हा वाद्यवृंद वावरतो. तरंगे नेसवून तयार होऊन पहिली विधिवत पूजा होईपर्यंत दशमी संपून एकादशी लागते.
पहाटेच्या शीतल चंद्रप्रकाशात पाच वाजता तरंगांची मिरवणूक भगवतीच्या मंदिराच्या दिशेने निघते. मिरवणूक जात असताना वाटेत कर्पे घराण्याला कौल दिला जातो. तरंगांनी भगवती देवीच्या मंदिराकडे जाणे हेच सीमोल्लंघन मानले जाते. भगवतीच्या मंदिरात तरंगांचे आगमन झाल्यावर अंतरपट धरून तरंगरूपी देवतांचे मंगलाष्टकांच्या उद्घोषात लग्न लागते. हा विवाह विधी झाल्यावर ठीक सहा वाजता तरंगे कोटकर घराण्याच्या मांगराच्या दिशेने प्रस्थान करतात.
पुर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे भगलतीच्या मंदिरातून निघून तरंगे कोटकर घराण्याच्या मांगरात येऊन विराजमान होतात. संपूर्ण एकादशीचा दिवस दोन्ही तरंगे कोटकर घराण्याच्या मांगरातच विराजित असतात. मध्यरात्री ठीक बारा वाजता दोन्ही तरंगे आपल्या पुढील वाटचालीसाठी निघतात
मध्यरात्री ठीक बारा वाजता निघून तरंगे भगवती मंदिरात येतात. तिथली पूजा झाल्यावर तरंगे व देवीचा संचार कौल देतात. दसरोत्सव व पोर्णिमेच्या उत्सवाचा दुसरा कौल विख्यात नटसम्राट प्रभाकर पणशीकर यांच्या घराण्याला दिला जातो. पुढचा कौलाचे मानकरी तालुक्याचे मामलेदार असतात. पुर्वीच्या काळी पोर्तुगीज आमदानीत तालुक्याच्या मुख्याधिकाऱ्याला हा कौल दिला जायचा पण गोवा मुक्तीनंतर मामलेदारपदावर कार्यरत व्यक्ती हा बहुमान स्विकारतात. शेकडो वर्षांपूर्वी देवस्थानच्या व्यवस्थापनाचे काम पाहणारे नाडकर्णी होते व त्यामुळे त्यांना कौलाचा मान होता. आता कार्यरत नसले तरीही या ठिकाणी त्यांना कौल दिला जातो.
भगवती मंदिराच्या पटांगणात तरंगांचे आगमन होते व सातेरी देवस्थानला भेट दिल्यानंतर पटांगणात कौलोत्सवाला सुरूवात होते. कोळस्कर प्रभुदेसाई, भिरोंडकर नाईक देसाई, गोरख नाईक देसाई, नानेरकर प्रभुदेसाई व सावळ देसाई या घराण्यांना सार्वजनिक ठिकाणी देवाचा कौल प्राप्त होतो व मांगराच्या दिशेने प्रस्थान ठेवले जाते. जाताना वैश्य व दैवज्ञ समाजातील घराण्यांना तसेच जोशी घराण्यांना कौल दिला जातो.
मांगरात पुनरागमन झाल्यावर तेथे समस्त भक्तांसाठी आशिर्वाद व मार्गदर्शन कार्यक्रम सुरू होतो व ज्यांना नानाविध प्रापंचिक अडचणी असतात ते आशिर्वाद व मार्गदर्शन घेण्यासाठी तेथे उपस्थिती लावतात.
द्वादशी ते पोर्णिमा या चारही दिवसांत मांगरात तरंगांना 'पावणेर' विधी केला जातो. पावणेर म्हणजे खीर, पुरी, असा पंचपक्वान्नांनी भरलेला महानैवेद्य पुरोहित श्री. जोशींच्या कुटूंबातर्फे तरंगांना अर्पण केला जातो. द्वादशीच्या संध्याकाळी एका प्रतिष्ठित ट्रस्टमार्फत किर्तनाचे आयोजन केले जाते व हे किर्तन संपताच सुश्राव्य अशा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम असतो. गायनाचा कार्यक्रम संपल्यावर पुन्हा देवस्थानतर्फे आयोजित वेगळी किर्तन सेवा असते. त्रयोदशीला हा अशाच प्रकारचा कार्यक्रम असतो.
चतुर्दशीला उपरोल्लेखित कार्यक्रम तशाच प्रकारे आयोजित केले जातात. रात्री दहा वाजता श्री रवळनाथाची पालखी मिरवणूक निघते. वाटेत भाविक, श्रीफळ, फळफळावळ फुले, माळा, हार, धूप, दीप तसेच इतर यथाशक्ती सेवा करतात. प्रथेप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी पालखी थांबून पुरोहितांतर्फे मंगलाष्टके म्हटली जातात. अशी मजल दरमजल करत पालखी तासाभरात ११ वाजता मांगरात आदिस्थानावर पोहोचते.
पोर्णिमेच्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे नित्यपूजा व अभिषेक तसेच दुपारी महानैवेद्य अर्पण केला जातो. ठीक बारा वाजता देवीच्या मांगरात तरंगांसमक्ष तुलाभार विधी केला जातो. एका माणसाचे वजन व तितक्याच वजनाच्या वस्तु तोलू शकेल एवढा तराजू तिथे आणून ठेवला जातो. ज्या भाविकांनी नवस केलेला आहे त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्यावर ते भाविक साखर, गूळ नारळ वा तांदूळ घालून आपला तुळाभार करतात व त्या वस्तू देवाला अर्पण करतात.
सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत भावगीत व अभंगांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित असतो. १ ते ०१:३० दरम्यान धुपारती व नैवैद्य आटोपल्यावर मध्यरात्री बारा वाजेपर्यंत ओटी भरणे व देवदर्शनाचा कार्यक्रम चालू असतो. बारा वाजल्यानंतर सामुदायिक गाऱ्हाणे सांगितले जाते. देवाची तरंगे मांगराच्या बाहेर राजांगणात आणली जातात व सर्व भाविकांसाठी कौलाला सुरूवात होते. पहाटे ०२:३० ते ०३:३० वाजता भाविकांसाठी आशिर्वाद व मार्गदर्शन कार्यक्रमाला सुरुवात होते. प्रापंचिक, शारिरिक व मानसिक समस्या असलेले भक्तगण या सोहळ्याला उपस्थिती लावतात. यानंतर पुढचा आशिर्वाद व मार्गदर्शन विधी करण्यासाठी तरंगे मारुती देवस्थानच्या प्रांगणात जाऊन मग रवळनाथ मंदिराकडे प्रस्थान करतात.
मंदिरात तरंगे आल्यावर विधीवत पूजा होऊन राजे श्री. देशप्रभु यांना कौल दिला जातो व तरंगे आतमध्ये मंदिरात येतात.
याठिकाणी सेवेकरी व महाजन यांच्या सहकार्याने तरंगे सोडवतात व त्या तरंगांच्या सोडवलेल्या लुगड्यांचे गाठोडे बांधले जाते. हे गाठोडे केवळ मंडळ बांधतो व ते गाठोडे घेऊन मडवळ आदिस्थान मांगराच्या दिशेने वाटचाल करतो. आदिस्थानावर त्या गाठोड्याची पूजा होते व ते गाठोडे पुढील वर्षभरासाठी मडवळाच्या स्वाधीन केले जाते.
मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हे देवस्थान अगदीच जवळ म्हणजे १६ मिनिटे म्हणजेच ११ किमीच्या अंतरावर आहे.
पेडणे रेल्वे स्टेशनपासून हे देवस्थान अडीच किलोमीटर अंतरावर आहे.
पेडणे आंतरराज्य व राज्यांतर्गत बस स्थानकापासून मंदिर २०० मीटरवर आहे.
देवस्थानचा स्वतःचा भक्तनिवास उपलब्ध नाही.
मोपा विमानतळ ते पेडणे शहरापर्यंतच्या महामार्गावर अनेक नवनवीन हॉटेल्स उपलब्ध आहेत जी उत्कृष्ट सोयीसुविधांनी युक्त आहेत.
म्हापसा शहरात उत्कृष्ट व स्वस्तात हॉटेल्स उपलब्ध आहेत व या इथून पेडणे शहर सुमारे १५ किमीच्या अंतरावर आहे.
भाविक म्हणून हा संपूर्ण महोत्सव पाहण्याचा विचार करत असाल तर रात्री जागरण करण्याची पुर्वतयारी ठेवणे आवश्यक आहे.
देवस्थान व महाजनांनी सांगितलेले नियम पाळणे आवश्यक आहे.
मद्यप्राशन, मांसाहार, मत्स्याहार किंवा कोणत्याही प्रकारचे अपेय पान करून, मंदिर, मांगर, किंवा मिरवणूकीत सहभागी होऊ नये.
गर्दी असताना गर्दीत घुसून दर्शन घेण्याचा प्रयत्न करणे अयोग्य आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.