

काळाच्या प्रवाहात मनोरंजनाची रूपे बदलत गेली, तरी काणकोण तालुक्याने आपल्या नाट्यपरंपरेचा दीप विझू दिलेला नाही. गोव्यात विनोदी, हलक्या-फुलक्या प्रयोगांची लाट असतानाही येथे मात्र आजही पौराणिक व ऐतिहासिक नाटकांची परंपरा इमानपूर्वक जपली जाते.
ही सादरीकरणे केवळ करमणुकीपुरती मर्यादित न राहता, संस्कार, संस्कृती आणि परंपरेचे वाहक बनली आहेत. विशेष म्हणजे, या परंपरेचा ध्वज आजची तरुण पिढीही अभिमानाने खांद्यावर घेऊन चालताना दिसते.
वेलवाडा येथील श्री गोपाळकृष्ण मंदिरात श्री परशुराम नाट्य मंडळ दरवर्षी पौराणिक कथेचा नवा आयाम अनुभवायची संधी आपल्या नाट्य सादरीकरणामार्फत देते. कीर्तनकार व ज्येष्ठ नाट्यकलाकार निशिकांत टेंग्से यांच्या मार्गदर्शनाखाली सादर होणारे हे प्रयोग आधुनिकतेची झळाळी असूनही मूळ परंपरेशी नाळ जोडून असतात.
यंदा मंदिराच्या वर्धापनदिनाच्या प्रसंगी ‘अमृत मोहिनी’ या पौराणिक नाटकाने रंगमंच उजळून निघाला. संवादांतील ओजस्वीपणा, अभिनयातील तन्मयता आणि संगीताची भावस्पर्शी साथ या साऱ्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. पार्वतीच्या भूमिकेत हेमा नाईक यांनी सामर्थ्याचा प्रभावी प्रत्यय दिला, तर श्रीशंकराच्या भूमिकेत मुकेश नाईक यांनी करुणा आणि वैराग्याचा गहिरा रंग भरला.
भस्मासूरची भुमिका रूपेश पैंगीणकर, नंदीची भुमिका उमेश सतरकर आणि नारदाची भुमिका निशाकांत टेग्से व बाळ च्यारी यांनी इंद्राची भुमिका तेवढ्याच समर्थपणे पेलली. वेगवेळ्या कलाकारांनी व्यक्तिरेखांमधून कथेला वेग व नाट्य दिले. या नाटकाला भार्गव टेंग्से यांचे भारदस्त हार्मोनियम वादन व सुतेंद्र महाले यांचे संयुक्तिक पार्श्वसंगीत लाभले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.