
अस्मि म्हापसा येथील सेंट मेरी विद्यालयात सहाव्या इयत्तेत शिकते. अस्मिला गणपती आवडतो आणि तिला त्याची मूर्ती बनवायची होती. या आधीही तिने गणेश मूर्ती बनवली होती पण यावेळी तिने ठरवले की एखाद्या गणेश मूर्ती कार्यशाळेत भाग घेऊन आपण ही मूर्ती बनवायची.
त्याप्रमाणे कार्यशाळेत भाग घेऊन तिने ती बनवलीही आणि विशेष म्हणजे आपल्या आजोबा- आजीच्या घरी (आईचे आई-वडील) गणेशाच्या मुख्य मूर्तीबरोबरच तिची प्रतिष्ठापनाही केली. गणेश मूर्ती मातीची असावी याबाबतीत जागरूकता तयार करण्याचे प्रयत्न सर्वत्र चाललेले आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सुबक मूर्तींचा धोका लोकांच्या लक्षात येत असला तरी अशा मूर्तींचा मोह अनेकांना आवरत नाही.
मात्र अस्मिसारख्या छोट्या मुलीकडून बनलेली गणेश मूर्ती सुबक नसली तरी तिची प्रतिष्ठापना करण्यात काही चुकीचे नाही. अस्मिने तयार केलेली गणेश मूर्ती पूजेला लावायची आहे हे भटजींना सांगताच भटजींनी देखील या मूर्तीची प्रतिष्ठापना करून दिली.
तिच्या आजी-आजोबांनी त्यासाठी मान्यता तर आधीच दिली होती. गणेश दर्शनासाठी आलेल्यांपैकी प्रत्येक जण तिथे पुजलेली छोटी गणेश मूर्ती पाहून ती कोणी बनवली आहे हे हमखास विचारतो. या गणेशमूर्तीचे होत असलेले कौतुक हा अस्मिसाठी दुहेरी आनंदाचा विषय असेल.
गणेशमूर्ती कार्यशाळेत लहान मुलांनी केलेल्या गणेश मूर्ती त्यांच्या पालकांनी पूजेला लावणे ही फक्त केवळ एक कौतुक करण्याची बाब नाही तर पारंपरिक मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्याचा तो एक जागरूक प्रयत्नही आहे. म्हापसा शहरातील दहा वर्षांच्या अस्मि नाईक हिने शिल्पकार चैताली मोरजकर हिच्या कार्यशाळेला हजेरी लावून तयार केलेल्या गणेश मूर्तीला तिच्या आजोबांच्या घरी मुख्य मूर्तीबरोबर स्थान मिळते आणि तिची प्राणप्रतिष्ठाही होते ही गोष्ट प्लास्टर ऑफ पॅरिसच्या धोकादायक जमान्यात दिलाशाची आहे, नाही का?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.