

गोवा-कोकण भागातील आयतार (रविवार) पूजन ही केवळ धार्मिक परंपरा नसून स्थानिक जैवविविधता आणि पारंपरिक वनस्पतीज्ञान जपणारी लोकपरंपरा आहे. श्रावणातील पावसाळ्यात परिसरात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या विविध गवत, औषधी वनस्पती, झुडपे व इतर वनस्पतींचा आयतार पूजनात वापर केला जातो. या परंपरेच्या माध्यमातून स्थानिक वनस्पतींची ओळख आणि त्यांच्याशी संबंधित ज्ञानाचे पिढ्यान्पिढ्या जतन झाले आहे.
श्रावण महिन्यात आयतार पूजनासाठी पारंपरिकरीत्या वापरल्या जाणाऱ्या विविध वनस्पतींची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ओळख करून देण्याचा आगळा अनुभवाधारित उपक्रम नायंगिणी-कुडचिरे सरकारी प्राथमिक शाळेत राबविण्यात आला.
प्रत्यक्ष आयतार पूजन न करता, पूजनासाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी शाळेपासून सुमारे एक किलोमीटर परिसरात परिसरभ्रमंती केली. या उपक्रमाला विवेकानंद पर्यावरण जागृती फौजेचे सदस्य व पर्यावरण अभ्यासक ॲड. सूरज मळीक यांचे मार्गदर्शन लाभले होते.
गोव्यात श्रावणातील रविवारी कष्टकरी सुवासिनी महिलांकडून तेज व प्रकाशाचे प्रतीक असलेल्या आदित्य अर्थात सूर्याचे पूजन पारंपरिक आयतार पूजनाद्वारे केले जाते. या पूजनात पावसाळ्यात परिसरात आढळणाऱ्या विविध वनस्पतींच्या घटकांचा वापर केला जातो.
यातील अनेक वनस्पतींचा उपयोग पूर्वी मनुष्य व जनावरांसाठी वनौषधी तसेच खाद्यान्न म्हणून होत असे. पर्यावरणीय परिसंस्थेत कृमी-कीटक आणि वन्यजीवांसाठीही या सर्व वनस्पती उपयुक्त असल्याचे ॲड. मळीक यांनी विद्यार्थ्यांना याप्रसंगी समजावून सांगितले. दरम्यान, तणनाशकांच्या वाढत्या वापरामुळे परिसरातील अनेक पारंपरिक वनस्पतींचे प्रमाण कमी होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील अनुभवाधारित शिक्षणाच्या संकल्पनेनुसार राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शाळेचा परिसरच विद्यार्थ्यांसाठी ‘जिवंत पाठशाळा’ ठरतो आहे. स्थानिक परंपरा, निसर्ग आणि अभ्यासक्रम यांची सांगड घालत विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील जैवविविधतेकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी त्यातून मिळते.
आयतार पूजनासाठी २५ हून अधिक वनस्पतींचा वापर केला जात असल्याची माहिती या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना देण्यात आली. परिसर भ्रमंतीदरम्यान विद्यार्थ्यांना आयताराचो माड (आयताराची छत्री), आयतारचे कातने, कावळ्याचे फोव, हरणा (सोनकी), म्हातारेची बोनरा, म्हातारेची चीनरा, आयताराची पिड्डूक, आयतारचे मुसळ, देव चिड्डो (तेरडा), आयतारची म्हणी (पाट), हरयाळी (दुर्वा), शेरवाडा, नागलो फूल, आयतारचो नासणो, आयताराची मावशी, रामाची बोटा, हळदीची पाने, आळूचे पान आणि आयताराचे गाठले अशा सुमारे २० वनस्पतींची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली.
विद्यार्थ्यांना केवळ वनस्पतींची नावे सांगण्याऐवजी त्या ओळखण्याची पद्धत शिकविण्यात आली. पानांची रचना, फुलांचे स्वरूप, वनस्पतीचा आकार, वाढीचे ठिकाण आणि इतर वैशिष्ट्यांचे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निरीक्षण केले. स्थानिक नावांमागील वैशिष्ट्ये समजून घेताना पूर्वजांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि निसर्गाशी असलेले त्यांचे नातेही विद्यार्थ्यांना यानिमित्ताने जाणून घेता आले. या उपक्रमातून शालेय अभ्यासक्रमातील वनस्पतीविषयक अध्ययनालाही स्थानिक लोकपरंपरा आणि परिसरातील जैवविविधतेशी जोडले गेले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.