

मोटारसायकल म्हटली की आपल्या डोळ्यांसमोर रस्त्यावर धावणारी बाइक येते. मात्र, चीनमधील एका व्यक्तीने ही कल्पनाच बदलून टाकली आहे. त्याने चक्क नदीच्या पाण्यावर मोटारसायकल चालवत तब्बल ४०.७४ किलोमीटरचे अंतर पार केले आहे. विशेष म्हणजे, या अनोख्या पराक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. झांग शुए (Zhang Xue) असे या विक्रमवीराचे नाव असून ते चीनमधील प्रसिद्ध मोटारसायकल कंपनी ZXMOTO चे संस्थापक आहेत. २५ ऑक्टोबर रोजी त्यांनी आपल्या मायभूमीत हा अनोखा विक्रम केला. त्यासाठी त्यांनी खास तयार केलेल्या MX450 मोटारसायकलचा वापर केला. अनेक वर्षांचे प्रयत्न, तांत्रिक बदल आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे अशक्य वाटणारे आव्हान पूर्ण केले आहे.
चीनमधील हुनान प्रांतातील हुआइहुआ शहरातील मयांग मियाओ ऑटोनॉमस काउंटी येथे झांग यांनी हा विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी खास तयार केलेल्या मोटारसायकलवरून नदीत निश्चित केलेल्या मार्गाचे तब्बल सहा फेरे पूर्ण केले. यादरम्यान त्यांनी ४०.७४ किलोमीटरचे अंतर पाण्यावरून पार केले. यापूर्वी याच प्रकारात ३१.८ किलोमीटरचा विक्रम नोंदवण्यात आला होता. मात्र, झांग यांनी जुन्या विक्रमापेक्षा जवळपास ९ किलोमीटर अधिक अंतर पार करत नवा इतिहास घडवला. या कामगिरीमुळे त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.
पाण्यावर मोटारसायकल चालवणे हे सामान्य काम नाही. त्यामुळे झांग आणि त्यांच्या टीमने बाइकच्या रचनेत अनेक महत्त्वाचे बदल केले होते. मोटारसायकल पाण्यात बुडू नये यासाठी विशेष फ्लोटिंग पार्ट्स बसवण्यात आले होते. तसेच इंजिन आणि इतर महत्त्वाच्या यंत्रणांमध्ये पाणी शिरू नये म्हणून आवश्यक भाग वॉटरप्रूफ करण्यात आले होते. या तांत्रिक बदलांमुळे बाइकला पाण्यावर तरंगत पुढे जाणे शक्य झाले.
या मोहिमेदरम्यान सुरक्षेचीही विशेष काळजी घेण्यात आली होती. झांग यांच्या सोबत रेस्क्यू बोट आणि वैद्यकीय पथक तैनात होते. पाण्यात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तातडीने मदत मिळावी, यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. विक्रमाची अधिकृत नोंद करण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी GPS डेटा, वेळेची माहिती आणि व्हिडीओ फुटेज तपासले. त्यानंतर या विक्रमाला अधिकृत मान्यता देण्यात आली.
झांग यांच्यासाठी हा विक्रम एका दिवसात मिळालेलं यश नाही. त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी पहिल्यांदा मोटारसायकल पाण्यावर चालवण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यानंतर त्यांनी अनेकदा यासाठी प्रयत्न केले. मात्र, सुरुवातीचे चारही प्रयत्न अपयशी ठरले. एका प्रयत्नात त्यांची बाइक केवळ २० मीटर अंतरापर्यंतच पाण्यावर चालू शकली होती. वारंवार अपयश येऊनही त्यांनी आपले स्वप्न सोडले नाही.
यावेळी विक्रमासाठी त्यांनी आणि त्यांच्या टीमने तब्बल पाच महिने तयारी केली. बाइकचे फ्लोटिंग पार्ट्स, वॉटरप्रूफ सील आणि पॉवर सिस्टीममध्ये अनेक बदल करण्यात आले. पाण्यात वारंवार चाचण्या घेऊन बाइक अधिक स्थिर आणि सुरक्षित करण्यावर भर देण्यात आला. या प्रयत्नांबाबत बोलताना झांग यांनी आपण हे आव्हान पूर्ण करू शकतो, असा विश्वास असल्याचे सांगितले. अपयश आले तरी पुन्हा प्रयत्न करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
झांग यांच्यासाठी हा विश्वविक्रम केवळ वैयक्तिक यश नाही, तर त्यांच्या जन्मभूमीला जगभरात ओळख मिळवून देण्याची संधीही आहे. आपल्या मायांग परिसराची अधिकाधिक लोकांना माहिती व्हावी आणि या भागाकडे पर्यटकांचे लक्ष वेधले जावे, अशी त्यांची इच्छा आहे. अनेक वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न पूर्ण करत त्यांनी तंत्रज्ञान, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या या अनोख्या कामगिरीची जगभर चर्चा होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.