Pakistan Government: फुटीरतावादी नेता आणि टेरर फंडिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या यासिन मलिकची पत्नी मुशाल मलिकला पाकिस्तान सरकारमध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
त्यांना काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मुशाल मलिक या पंतप्रधानांच्या विशेष सहाय्यक असतील. त्यांनी आज (गुरुवारी) शपथ घेतली.
मुशाल मलिक व्यतिरिक्त जलील अब्बास जिलानी परराष्ट्र मंत्री, सरफराज बुगती गृहमंत्री, डॉ. शमशाद अख्तर अर्थमंत्री, जनरल (आर) अन्वर अहमद संरक्षण मंत्री झाले आहेत. काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक यांच्या मंत्रिमंडळाने आज शपथ घेतली.
दरम्यान, मुशाल मलिक आणि यासिन मलिक यांचा विवाह 22 फेब्रुवारी 2009 रोजी रावळपिंडीमध्ये झाला होता. 2005 मध्ये यासिन पाकिस्तानात (Pakistan) गेला तेव्हा त्याची मुशालशी भेट झाली होती. मुशाल लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवीधर आहेत.
मुशालची आई रेहाना मलिक या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) च्या महिला शाखेच्या सचिव होत्या. तर त्यांचे वडील अर्थतज्ज्ञ होते. मुशालच्या भावाबद्दल बोलायचे झाल्यास, तो परराष्ट्र व्यवहारात जाणकार आहे. मुशाल इस्लामाबादमध्ये त्यांच्या बहिणीसोबत राहतात.
दुसरीकडे, यासीन मलिक 2019 पासून तुरुंगात आहे. 2017 च्या टेरर फंडिंग प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. एनआयएने (NIA) यासिनविरोधात गुन्हा दाखल केला होता. गेल्या वर्षी मे महिन्यात दिल्ली न्यायालयाने यासिनला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
यासिन मलिकला यूएपीएसह सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. 2017 मध्ये काश्मीर खोर्यात अशांतता निर्माण करणाऱ्या दहशतवादी कारवायांचा त्याच्यावर आरोप होता.
कलम 16 (दहशतवादी कायदा), 17 (दहशतवादी कृत्यासाठी निधी उभारणे), 18 (दहशतवादी कृत्य करण्याचा कट रचणे) आणि 20 (दहशतवादी गटाचा सदस्य) याअंतर्गत त्याला दोषी ठरवण्यात आले आहे.
तसेच, यासिनचा जन्म 1966 मध्ये श्रीनगरच्या मैसुमा भागात झाला होता. 1989 मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबैय्या सईदचे अपहरण आणि श्रीनगरमध्ये भारतीय हवाई दलाच्या जवानांवर जेकेएलएफच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी दाखल केलेल्या खटल्यांचा तो सामना करत आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.