Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी देशातील महिलांना किमान 8 मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलं आहे. एवढचं नाही तर मोठ्या कुटुंबांकडे सामान्य नजरेने पाहावे लागेल आणि हे आवश्यक आहे असेही ते म्हणाले. मॉस्कोमध्ये जागतिक रशियन पीपल्स कॉन्सिलला संबोधित करताना पुतिन म्हणाले की, रशियातील जन्मदर 1990 पासून घसरत आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून रशिया युक्रेनबरोबर युद्धात आहे. इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, या युद्धात आतापर्यंत 3 लाखांहून अधिक सैनिकांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या मानव संसाधनाच्या दृष्टीने हे मोठे नुकसान आहे. रशिया हा एक मोठा देश आहे, परंतु लोकसंख्येची घनता कमी आहे. रशियाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
पुतिन म्हणाले की, येत्या काही दशकांमध्ये लोकसंख्या वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. ते पुढे म्हणाले की, आपल्याकडे आजही मोठ्या कुटुंबांवर विश्वास ठेवणारे अनेक समाज आहेत. त्यांना 4, 5 किंवा अधिक मुले आहेत. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्या आजी-आजोबांना 7, 8 किंवा त्याहून अधिक मुले होती. मोठ्या घराण्याची परंपरा आपल्याला जिवंत ठेवायची आहे. हा एक सामान्य नियम बनवावा लागेल. मोठी कुटुंबे असणे हा आपल्या जीवनशैलीचा भाग असावा. कुटुंब हा केवळ राज्याचा आणि समाजाचा आधार नसून तो धार्मिक दृष्टिकोनातूनही योग्य असल्याचे ते म्हणाले.
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे भाषण राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहे. "आपल्या लोकसंख्येचे संरक्षण आणि विस्तार करणे हे पुढील काही दशकांसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी आपले ध्येय असले पाहिजे," असेही पुतीन म्हणाले. हे जगातील रशियाचे भविष्य असेल. ही आमची गरज आहे. हा कार्यक्रम रशियन ऑर्थोडॉक्स चर्चने आयोजित केला होता. रशियातील अनेक समुदायांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यामध्ये व्लादिमीर पुतिन यांनी कौटुंबिक मूल्ये जतन करुन कुटुंबाचा विस्तार करण्याचे सुचवले.
दुसरीकडे, पुतीन यांनी आपल्या भाषणात युक्रेनमध्ये मारल्या गेलेल्या सैनिकांचा उल्लेखही केला नाही, पण लोकसंख्या वाढवण्यासंबंधी वक्तव्य करायला ते विसरले नाहीत. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे की, या युद्धात रशियाचे सुमारे 3 लाख सैनिक मारले गेले आहेत. एवढेच नाही तर रशियातून 8 ते 9 लाख लोकांनी स्थलांतर केल्याचा दावाही केला जात आहे. एवढेच नव्हे तर आर्थिक स्थितीही खराब होत चालली आहे. रशियातही कामगार संख्या कमी होत असून तरुणांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत घटणारी लोकसंख्या देशासमोर सर्व प्रकारचे संकट निर्माण करत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.