

US Iran War End Donald Trump Peace Deal Statement: अमेरिका आणि इराण यांच्यात गेली सात महिने सुरु असलेला भीषण संघर्ष आता अंतिमतः समाप्तीच्या दिशेने पुढे सरकत असल्याची आशा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली. ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांशी बोलताना दावा केला की, इराणशी थेट संपर्क प्रस्थापित झाला असून तेहरान शांतता करारासाठी तयार आहे. ट्रम्प यांच्या मते, हे युद्ध आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचले असून अमेरिका आणि इराण यांच्यात एका संभाव्य कराराचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र, ट्रम्प यांच्या दाव्यानंतरही इराणने यावर अत्यंत सावध आणि संयमी भूमिका घेतली असून, कोणत्याही अंतिम कराराची अधिकृत पुष्टी करण्यास स्पष्ट नकार दिला.
इराणच्या अधिकाऱ्यांनी थेट चर्चेच्या दाव्यांना पूर्णपणे स्पष्ट केलेले नसून, राजनैतिक चर्चा पुढे गेल्यास इराणचे राष्ट्रीय सार्वभौमत्व, सुरक्षा आणि हितसंबंधांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही यावर भर दिला. विशेष म्हणजे, 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका (America) आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांनंतर या भीषण युद्धाला सुरुवात झाली. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलसह अमेरिकी लष्करी तळ असलेल्या आखाती देशांना लक्ष्य केले. गेल्या सात महिन्यांपासून सुरु असलेल्या या महायुद्धात हजारो लोकांचा बळी गेला असून लाखो नागरिक विस्थापित झाले.
दुसरीकडे, जागतिक पातळीवर राजनैतिक हालचालींना प्रचंड वेग आला. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली. या बैठकीत चीनने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आणि जूनमध्ये झालेल्या अंतरिम शांतता कराराला पुनरुज्जीवित करण्याचे आवाहन केले. अराघची यांनी स्पष्ट केले की, इराण स्वतःच्या रक्षणासाठी पूर्णपणे सक्षम आहे, परंतु आपल्या अधिकारांचे रक्षण करणाऱ्या कोणत्याही राजनैतिक चर्चेसाठी त्यांचे दरवाजे उघडे आहेत.
दरम्यान, पुढील आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष ट्रम्प आखाती सहकार्य परिषदेच्या नेत्यांशी इराण युद्धोत्तर परिस्थितीवर महत्त्वाची बैठक घेण्याची शक्यता आहे. अशातच, इराणच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करत हा संघर्ष खरोखरच शांततेत रुपांतरित होतो की, हे दावे केवळ राजनैतिक रणनीतीचा भाग ठरतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.