Russia-UKraine War Updates: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला फेब्रुवारी 2024 मध्ये तीन वर्षे पूर्ण होतील. सध्याची परिस्थिती पाहता युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु असलेले युद्ध वर्षानुवर्षे सुरु राहणार असल्याचे दिसते. जपानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुतिन सध्या युक्रेनमधील युद्ध थांबवण्याचा विचार करत नाहीत. त्यांनी युक्रेनवर बॉम्बहल्ले सुरु ठेवण्याची धमकी दिली आहे. पुतिन आणि जिनपिंग यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर हा अहवाल समोर आला आहे. दुसरीकडे, युक्रेनमधील गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने तिजोरी उघडली आहे. अमेरिकेने युक्रेनला US$250 दशलक्ष किमतीची नवीन मदत पाठवली आहे. आतापर्यंत अमेरिकेने युक्रेनला 44 अब्ज डॉलर्सची मदत दिली आहे.
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये फेब्रुवारी 2022 पासून युद्ध सुरु झाले. रशियन सैन्य युक्रेनच्या विविध शहरांवर बॉम्बहल्ले अजूनही करत आहेत. या युद्धात हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले असून लाखो लोक बेघर झाले आहेत. या युद्धात रशियाचेही मोठे नुकसान झाले आहे. अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या मदतीने युक्रेनचे सैनिक रशियन हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत आहेत.
गुरुवारी युद्धाच्या ताज्या अपडेटवरुन असे दिसून आले की, बुधवारी उशिरा रशियन सैन्याने युक्रेनच्या दक्षिणी ओडेसा प्रदेशात रात्रभर डझनभर हवाई हल्ले केले. इराणच्या ड्रोन हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी आहेत. युक्रेनियन हवाई दलाने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी रशियाने लॉन्च केलेल्या 46 पैकी 32 इराणी-निर्मित ड्रोन पाडले. स्थानिक गव्हर्नर ऑलेक्झांडर प्रोकुडिन यांनी सांगितले की, खोरासन प्रांतातील आणि राजधानी कीववरील हल्ल्यामुळे निवासी क्षेत्रे उद्ध्वस्त झाली. पॉवर ग्रीडचेही नुकसान झाले आहे. खोरासमधील सुमारे 70 टक्के घरांमध्ये वीज नाही.
दरम्यान, जपानी मीडिया आउटलेट निक्केई एशियाने सूत्रांचा हवाला देत दावा केला आहे की मार्चमध्ये मॉस्को येथे झालेल्या बैठकीदरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांचे चिनी समकक्ष शी जिनपिंग यांना सांगितले होते की रशिया युक्रेनमध्ये "किमान पाच वर्षे लढेल." सध्याच्या युद्ध परिस्थितीबाबत रशियन सैन्य बॅकफूटवर गेल्याने पुतिन नाराज असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांनी शी जिनपिंग यांना आश्वासन दिले की, शेवटी रशियाचा विजय होईल. मॉस्कोने फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर शी जिनपिंग यांची ही पहिलीच रशियाला भेट होती. चीनने आपले झिरो कोविड धोरण रद्द केल्यानंतर जिनपिंग यांनी विकसित आणि आघाडीच्या देशाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती.
युनायटेड स्टेट्सने जाहीर केले आहे की, ते रशियाच्या वाढत्या हल्ल्यांदरम्यान युक्रेनला $250 दशलक्ष किमतीची शस्त्रे आणि उपकरणे देणार आहेत. या वर्षातील हे शेवटचे पॅकेज असेल. या मदत पॅकेजमध्ये तोफखाना आणि हवाई संरक्षण यंत्रणांसाठी दारुगोळा तसेच चिलखतविरोधी दारुगोळा आणि लहान शस्त्रास्त्रांच्या 15 दशलक्षाहून अधिक गोळ्यांचा समावेश आहे. यूएस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर पूर्ण प्रमाणात आक्रमण केल्यापासून अमेरिकेने युक्रेनला अंदाजे $44.3 अब्ज डॉलर्सची लष्करी मदत दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.