काबुल: तालीबानी (Taliban) संघटना लवकरच काबुलमधील (Kabul) अध्यक्षीय संकुलातून इस्लामिक अमीरात (Islamic Emirate) निर्माण करण्याची घोषणा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 11 सप्टेंबर 2001 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर, अमेरिकेच्या (America) नेतृत्वाखालील सैन्याने अफगाणिस्तानातून (Afghanistan) तालिबानला पळवून लावले. परंतु याआधीच हल्ले सुरू करण्यापूर्वीच तालीबानी संघटनेने युद्धग्रस्त देशाचे नाव इस्लामी अमिरात अफगानिस्तान असे ठेवले होते.
आता अफगाण नेत्यांनी तालिबानला भेटण्यासाठी आणि सत्ता हस्तांतरण व्यवस्थापित करण्यासाठी समन्वय परिषद स्थापन केली आहे. यापूर्वी तालिबानने राजधानी काबूलचा ताबा घेतला होता. माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. "या परिषदेचे नेतृत्व 'High Council for National Reconciliation' चे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला, हिज्ब-ए-इस्लामीचे प्रमुख गुलबुद्दीन हेक्मतयार आणि ते स्वतः करतील. अराजकता रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे," असे निवेदनात म्हटले आहे.
तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी ताब्यात घेतल्यानंतर आणि राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडल्याच्या पार्श्वभूमीवर अफगाण नेते इस्लामाबादमध्ये पोहचले, अफगाणिस्तानसाठी अनेक वरिष्ठ नेते रविवारी पाकिस्तानात दाखल झाले. राजदूत मुहम्मद सादिक यांनी ट्विट केले की अध्यक्ष उलुसी जिरगा मीर रहमानी माजी मंत्री सलाहुद्दीन रब्बानी, माजी उपराष्ट्रपती मोहम्मद युनूस वकील, ज्येष्ठ नेते अहमद झिया मसूद, अहमद वली मसूद, अब्दुल लतीफ पेदेरम, खालिद नूर आणि उस्ताद मोहम्मद मोहकीक शिष्टमंडळाचा भाग आहेत. या भेटीदरम्यान परस्पर हिताच्या बाबींवर चर्चा केली जाईल. या गटात 2001 मध्ये तालिबानला सत्तेवरून हटवल्यानंतर सरकारांमध्ये राहिलेल्या लोकांचा समावेश आहे.
अमेरिकन दूतावास रिकामा केला जातोय: ब्लिंकेन
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकेन म्हणाले की अमेरिका काबूलमधील आपल्या दूतावासातून उर्वरित कर्मचाऱ्यांना पद्धतशीरपणे बाहेर काढत आहे. काबूलमध्ये दूतावास रिकामा करण्यासाठी अमेरिकन लष्करी हेलिकॉप्टर घिरक्या घालतांनाचे चित्र पहायाला मिळाले.
अफगाणिस्तानच्या संकटावर चर्चा करण्यासाठी ब्रिटनमध्ये संसदेची बैठक होणार आहे. संसदेत अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ब्रिटिश खासदारांना उन्हाळ्याच्या सुट्टीतून परत बोलावले जात आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, संसदेची बुधवारी एक दिवस बैठक होईल जिथे या संकटावर सरकारच्या प्रतिसादावर चर्चा होणार आहे.
भारताकडून आखण्यात आली विशेश योजना
अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या भारताने आपले शेकडो अधिकारी आणि नागरिकांना काबूलमधून बाहेर काढण्याची आकस्मिक योजना बनवली आहे. तालिबानने रविवारी सकाळी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केल्याच्या बातमीनंतर तेथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान अफगाणिस्तानच्या अध्यक्षांनी देश सोडला. या घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या लोकांनी सांगितले की भारत काबुलमधील भारतीय दूतावासातील आपल्या कर्मचाऱ्यांचा आणि भारतीय नागरिकांचा जीव धोक्यात घालणार नाही म्हणून आपत्कालीन परिस्थितीत त्यांना बाहेर काढण्याची योजना भारताकडून आखण्यात आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.