

Shocking Bike Stunt Video: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे मनोरंजनाचे सर्वात मोठे माध्यम बनले आहे. तासन् तास रील्स आणि व्हिडिओ पाहण्यात माणूस गुंगूंन जातो. अनेकदा सोशल मीडियावर असे काही व्हिडिओ समोर येतात जे पाहून नेटिझन्सना हसू आवरत नाही, तर काही व्हिडिओ पाहून थेट अंगावर काटा येतो. सध्या असाच एक भन्नाट आणि त्याचवेळी प्रचंड थरारक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्टंटबाजी करण्याच्या नादात दोन तरुणांना भयंकर अपघाताला सामोरे जावे लागले.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण भरधाव वेगात बाईक चालवताना दिसत आहे, तर दुसरा तरुण त्याच्या पाठिमागे बसला आहे. अचानक बाईक चालवणाऱ्या पठ्ठ्याला काय सुचते कोणास ठाऊक, तो रस्त्यावरच स्टंटबाजी करु लागतो. बाईकचा पुढचा भाग हवेत उचलून 'व्हीली' मारण्याच्या प्रयत्नात तो हँडल स्वत:कडे खेचतो. मात्र, पुढच्याच क्षणी असा काही धक्कादायक प्रकार घडतो ज्याची कल्पनाही त्यांनी केली नसेल. तरुणाने हँडल आपल्याकडे खेचताच संपूर्ण हँडलच बाईकपासून वेगळा होऊन त्याच्या हातात येतो आणि पुढचे चाकही रस्त्यावर बाईकपासून वेगळे होते. बाईकचे हँडल आणि चाक निघाल्यामुळे अचानक तोल ढासळतो आणि हे दोघेही भरधाव वेगात थेट कडक सिमेंटच्या रस्त्यावर आदळतात.
हा थरारक आणि विचित्र व्हिडिओ इन्स्टाग्रामवर 'a11_ho3eni' नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आला. व्हिडिओचा दर्जा आणि परिसर पाहून हा प्रसंग पाकिस्तानमधील असावा असा अंदाज बांधला जात आहे. बातमी लिहेपर्यंत या व्हिडिओला सुमारे 1.9 दशलक्ष (19 लाखांपेक्षा जास्त) लोकांनी लाईक केले. नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. एका युजरने उपरोधाने लिहिले की, "झोपण्यापूर्वी डोक्याला शांतता देणारा हा व्हिडिओ आहे," तर दुसऱ्याने "अशा जीवघेण्या स्टंटबाजीमुळे निष्पाप लोकांचा जीव धोक्यात येतो" असे म्हणत संताप व्यक्त केला. छुप्या कॅमेऱ्यात कैद झालेला हा थरार सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान चर्चेत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.