रशियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर व्लादिमीर पुतिन अधिक आक्रमक झाले आहेत. युक्रेनसह युरोप आणि पाश्चात्य देशांना ‘पुतिन अगेन’ची जाणीव करुन देण्यासाठी त्यांनी युक्रेनची राजधानी कीववर 44 दिवसांत पहिल्यांदाच सर्वात मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.
रशियन सैन्याने गुरुवारी पहाटे कीववर एकाच वेळी 31 बॅलेस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागून संपूर्ण युक्रेनमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. मात्र, युक्रेनच्या हवाई दलाने ही सर्व क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला आहे. पण क्षेपणास्त्रांचा मारा झाल्याने अनेक गगनचुंबी इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत, यामध्ये चिमुकलीसह 13 जण जखमी झाल्याची माहिती आहे.
कीव प्रशासनाचे प्रमुख सेर्ही पोप्को यांनी सांगितले की, राजधानीतील रहिवासी पहाटे 5 च्या सुमारास मोठा स्फोट ऐकून जागे झाले कारण जवळजवळ एकाच वेळी वेगवेगळ्या दिशांनी क्षेपणास्त्रे डागली गेली. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले की, रशियाने राजधानीवर दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे (Ballistic Missiles) आणि 29 क्रूझ क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात जखमी झालेल्या एका 11 वर्षीय मुलीला आणि अन्य 38 वर्षीय पुरुषाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे शहर प्रशासनाने सांगितले. कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सांगितले की, इतर आठ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
युक्रेनच्या (Ukraine) आपत्कालीन सेवेनुसार सुमारे 80 लोकांना त्यांच्या घरातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या हल्ल्यात एका अपार्टमेंटला आग लागली. तर अनेक पार्क केलेल्या गाड्या जाळल्या आणि रस्त्यांवर आणि एका लहान उद्यानात मोठे खड्डे पडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. दुसरीकडे, अलीकडच्या काही दिवसांत युक्रेनच्या सीमेजवळील रशियाच्या बेल्गोरोड प्रदेशावर युक्रेनने वारंवार हवाई हल्ले केले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बुधवारीच या हल्ल्यांना 'प्रत्युत्तर' देण्याची धमकी दिली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.