

Bondi Beach Shooting: ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात असलेल्या जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर रविवारी (14 डिसेंबर) अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या या गोळीबाराने परिसरात दहशत पसरली. लोकांनी घाबरुन इकडे तिकडे धावण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर लोकांनी किंकाळ्या मारण्यास सुरुवात केली. घटनेच्या व्हिडिओमध्ये काही जखमी लोकांना अन्य व्यक्ती जीव वाचवण्यासाठी सीपीआर देताना दिसत आहेत. घटनास्थळी प्रचंड धावपळ आणि आरडाओरड सुरु आहे.
न्यू साउथ वेल्स पोलिसांनी (New South Wales Police) या 'घटने'बद्दल माहिती दिली. तसेच लोकांना या परिसरापासून दूर राहण्याचे आणि तिथे उपस्थित असलेल्यांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन केले. त्याचवेळी, पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन व्यक्तींना ताब्यात घेतल्याची पुष्टी केली. मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे 'ऑपरेशन' अजूनही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्यक्षदर्शींनी आणि सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, काळ्या कपड्यांमध्ये असलेले दोन बंदूकधारी एका पुलावर दिसले. त्यांनी अनेक राऊंड गोळीबार केला. स्थानिक नागरिकांनी कमीतकमी एक डझन ते 50 पर्यंत गोळ्यांचे आवाज ऐकले. लोक बॉन्डी बीचवर मिळेल त्या दिशेने जीव वाचवण्यासाठी पळताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. परिसरात पोलिसांच्या सायरनचा आवाज घुमत आहे. त्याचवेळी, काही रिपोर्ट्समध्ये हा हल्ला हनुक्का या ज्यू सणाच्या उत्सवादरम्यान झाल्याचे म्हटले. 'चबाड ऑफ बॉन्डी' द्वारे आयोजित 'चानुका बाय द सी' नावाचा कार्यक्रम या भागात सुरु होता.
या घटनेत अनेक लोक जखमी झाले असल्याची माहिती आहे. ऍम्ब्युलन्स सेवेने दिलेल्या माहितीनुसार, कमीतकमी 10 लोक जखमी झाले आहेत. काही माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, मात्र पोलिसांनी अद्याप या मृत्यूला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. तसेच, सिडनीमध्ये इतर कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारची घटना घडली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्याचवेळी, ऑस्ट्रेलियाचे (Australia) पंतप्रधान एंथनी अल्बानीज यांच्या कार्यालयाने या घटनेची माहिती मिळाल्याचे सांगितले. नागरिकांना पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले. न्यू साउथ वेल्सचे प्रीमियर क्रिस मिन्स यांनी या घटनेला "अत्यंत त्रासदायक" म्हटले. सध्या पोलीस या घटनेची कसून चौकशी करत आहेत. हल्ला करण्यामागे नेमका उद्देश काय होता, याचा शोध घेतला जात आहे. दोन बंदूकधारी ताब्यात घेण्यात आले असले तरी, परिसरात अजूनही तणावाचे वातावरण असून या घटनेबद्दल अधिक माहिती उपलब्ध झाल्यानंतर पुढील अपडेट दिले जातील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.