

पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथे एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक बॉम्बस्फोट झाला आहे. क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकच्या कडेला झालेल्या या शक्तिशाली स्फोटात तब्बल २३ लोकांचा मृत्यू झाला असून ४७ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, क्वेटा कॅंट परिसराच्या दिशेने जाणाऱ्या एका शटल ट्रेनला चमन फाटकाजवळ लक्ष्य करण्यात आले. हा स्फोट इतका तीव्र होता की, ट्रेनच्या इंजिनसह तीन डबे रुळावरून घसरले आणि दोन डबे थेट उलटले. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात एकच गोंधळ आणि अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले होते.
स्फोटाचा आवाज एवढा प्रचंड होता की, आसपासच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या १० हून अधिक वाहनांचे मोठे नुकसान झाले. धक्कादायक बाब म्हणजे, स्फोटानंतर घटनास्थळी काही वेळ गोळीबाराचे आवाजही ऐकू आले, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे.
बलुचिस्तान सरकारचे अधिकारी बाबर युसूफझाई यांनी सांगितले की, पोलीस, सुरक्षा दल आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहून सरकारी रुग्णालयांमध्ये तात्काळ आणीबाणी (Emergency) घोषित करण्यात आली आहे.
या आत्मघातकी किंवा नियोजित हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. मात्र, बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील असा प्रदेश आहे, जिथे बऱ्याच काळापासून फुटीरतावादी आणि हिंसक कारवाया सुरू आहेत. अनेक स्थानिक गट बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी थेट पाकिस्तन सरकारविरुद्ध लढा देत आहेत.
या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पेशावरला जाणारी जाफर एक्सप्रेस क्वेटा स्टेशनवरच रोखून धरण्यात आली आहे. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री मोहम्मद हनीफ अब्बासी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हा एक भ्याड दहशतवादी हल्ला असल्याचे सांगत त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आणि रेल्वे सेवा थांबवली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.