Balochistan Terrorist Attack: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून दहशतवादी हल्ल्याची मोठी बातमी येत आहे. बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाला असून त्यात बसमधील नऊ प्रवाशांसह 11 जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी प्रथम शुक्रवारी नोश्की जिल्ह्यातील महामार्गावर बस थांबवली आणि नंतर बंदुकीच्या धाकावर नऊ जणांचे अपहरण केले. नऊ जणांचे मृतदेह नंतर जवळच्या डोंगराळ भागात एका पुलाजवळ सापडले आणि त्यांच्या शरीरावर गोळ्यांचे छिद्र आढळले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
घटनेची माहिती देताना अधिकारी म्हणाले की, ही बस क्वेटाहून तफ्तानला जात असताना हल्लेखोरांनी बस थांबवली आणि प्रवाशांची ओळख पटवल्यानंतर नऊ जणांचे अपहरण करुन त्यांना डोंगराळ भागात नेले. यापूर्वीही याच महामार्गावर एका कारवर गोळीबार झाला होता, ज्यात दोन प्रवासी ठार झाले होते, तर दोन जण जखमी झाले होते.
या घटनेवर बोलताना बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती म्हणाले की, नोश्की महामार्गावर 11 जणांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही आणि त्यांना लवकरच पकडले जाईल. बलुचिस्तानची शांतता बिघडवणे हा या दहशतवाद्यांचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनीही या घटनेचा निषेध केला आणि या कठीण काळात सरकार मृतांच्या कुटुंबियांसोबत असल्याचे सांगितले.
या हत्यांची जबाबदारी अद्याप कोणत्याही प्रतिबंधित संघटनेने स्वीकारली नसली, तरी या वर्षात अलीकडच्या आठवडय़ात बंदी घातलेल्या संघटना आणि दहशतवाद्यांकडून दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पाकिस्तानात गुन्हेगारी झपाट्याने वाढत आहे. नुकतेच पाकिस्तानमधून हिंदू स्थलांतरित होत असल्याची बातमी आली होती. याशिवाय, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यामुळे पाकिस्तानमध्ये होत असलेल्या अत्याचारांवर प्रकाश पडतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.