

Pakistan Airstrike Afghanistan Kunar Paktika: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमाविवाद पुन्हा एकदा पेटला असून पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी अफगाणिस्तानच्या पूर्व भागातील कुनार आणि पक्तिका प्रांतांवर बॉम्बवर्षाव केला. आज (21 सप्टेंबर) भल्या पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी फायटर जेट्स अचानक अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीत शिरले आणि त्यांनी कुनार प्रांतातील नर्गल जिल्ह्यातील पतंग भागात जोरदार बॉम्बवर्षाव केला. या अनपेक्षित आणि भीषण हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड घबराट आणि भीतीचे वातावरण पसरले. या एअरस्ट्राइकमध्ये अनेक नागरिक जखमी झाले असून काही घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी हवाई दलाने विशेषतः नूर मोहम्मद नावाच्या एका स्थानिक व्यक्तीच्या घराला लक्ष्य करुन त्यावर क्षेपणास्त्रे डागली. हा हल्ला इतका तीव्र होता की, ते घर काही क्षणात मलब्याच्या ढिगाऱ्यात रुपांतरित झाले आणि आजूबाजूच्या शेजारच्या घरांनाही मोठा फटका बसून ती कोसळली. हल्ल्यानंतर सकाळी स्थानिक लोक मलब्याखाली आपल्या उर्वरित वस्तू शोधताना दिसले, जिथे वापरलेल्या बॉम्बचे अवशेषही सापडले. या हल्ल्याच्या वेळी घरात नेमके किती लोक उपस्थित होते आणि किती जीवितहानी झाली, याचे अधिकृत आकडे अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. मात्र, अफगाण प्रशासनाने या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी तातडीने मदत पथके घटनास्थळी रवाना केली आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारमध्ये 'ड्युरंड लाईन' ही 2640 किलोमीटरची सीमा आणि 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' या दहशतवादी संघटनेच्या मुद्द्यावरुन तीव्र वाद सुरु आहे. एप्रिल 1893 मध्ये ब्रिटिशांनी आखलेली ही ड्युरंड लाईन अफगाणिस्तानचे तालिबान शासन अधिकृत आंतरराष्ट्रीय सीमा मानण्यास साफ नकार देते. तालिबानच्या मते या सीमेमुळे पश्तून आणि बलोच जमातींची घरे अनैसर्गिकपणे दोन देशांत विभागली गेली आहेत. एकेकाळी जवळचे व्यापारी आणि धोरणात्मक भागीदार असणारे हे दोन्ही शेजारी देश आज एकमेकांसमोर लष्करी कारवाई करत उभे ठाकले असून या एअरस्ट्राइकमुळे मध्य आशियातील प्रादेशिक शांततेला मोठा धोका निर्माण झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.