

Nigeria Terrorist Attack Borno State: नायजेरियाच्या ईशान्य भागात इस्लामिक दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा रक्ताचा खेळ खेळला. एका दुर्गम गावावर मध्यरात्री करण्यात आलेल्या भीषण हल्ल्यात 11 निष्पाप गावकऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून दोन जण गंभीररित्या जखमी झाले. स्थानिक अधिकाऱ्यांनी बुधवारी या घटनेची माहिती देताना सांगितले की, दहशतवाद्यांनी केवळ लोकांचा बळी घेतला नाही, तर अनेक घरांना आग लावून संपूर्ण गाव भस्मसात करण्याचा प्रयत्न केला. या अमानवीय कृत्यामागे 'बोको हराम' या कुख्यात दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या नायजेरियात गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या सुरक्षा संकटातील हा सर्वात ताजा आणि वेदनादायक हल्ला मानला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला मंगळवारी उशिरा रात्री बोर्नो राज्यातील साम्बिसा जंगलाच्या सीमेजवळ असलेल्या पुबागु या दुर्गम गावात झाला. बोर्नो राज्य हे गेल्या अनेक दशकांपासून नायजेरियातील इस्लामिक बंडाळी आणि दहशतवादाचे केंद्र राहिले. गावकऱ्यांनी बुधवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात मृतांना दफन केले. स्थानिक कौन्सिलचे अध्यक्ष मवादा सैदू उबा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पुबागु हे गाव आतापर्यंत सुरक्षित मानले जात होते. यापूर्वी या भागात कधीही असा भीषण हल्ला झाला नव्हता, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये सध्या दहशतीचे वातावरण आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
हल्लेखोरांनी गावात प्रवेश करताच अंदाधुंद गोळीबार सुरु केला आणि त्यानंतर घरांना आगी लावल्या. स्थानिक प्रभाग अधिकारी उस्मान रुमिरगो यांनी सांगितले की, दहशतवादी संपूर्ण गावाला लक्ष करुन पसार झाले. नायजेरियातील ग्रामीण भागातील कमकुवत सुरक्षा व्यवस्थेचा फायदा घेऊन दहशतवादी आणि दरोडेखोरांचे गट सातत्याने अशा दुर्गम गावांना लक्ष्य करत आहेत. नायजेरियात (Nigeria) सध्या बोको हरामसह 'इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रोव्हिन्स' (ISWAP) आणि 'लकुरावा' यांसारख्या अनेक दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. हे गट केवळ हत्याच करत नाहीत, तर खंडणीसाठी अपहरण आणि अवैध खाणकामातही गुंतलेले आहेत.
नायजेरियातील या वाढत्या हिंसाचारामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्रामीण भागातील नागरिक मृत्यूच्या छायेत जगत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.