इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये राजकीय (Pakistan Politics) नाट्य सुरू आहे. इम्रान खान (Imran Khan) यांच्या अविश्वास ठरावातील पराभवानंतर नव्या पंतप्रधानांच्या निवडीबाबतचा गोंधळ आणखी वाढला आहे. सोमवारी देशाच्या नव्या पंतप्रधानांसाठी मतदान होणार आहे. तत्पूर्वी, नॅशनल असेंब्लीमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर शनिवारी रात्री उशिरा मतदान झाले. यावेळी इम्रान खानला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. देशाच्या इतिहासात अविश्वास ठरावाद्वारे हटवले जाणारे खान हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
नॅशनल असेंब्लीचे पीठासीन अधिकारी अयाज सादिक यांच्या हवाल्याने डॉन वृत्तपत्राने म्हटले आहे की, नवीन पंतप्रधानांसाठी रविवारी दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येतील. त्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत तपासणी होईल. उद्या सोमवारी सकाळी 11 वाजता अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यादरम्यान नवा पंतप्रधान निवडला जाईल.
पुढचा पंतप्रधान कोण होणार?
पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) चे अध्यक्ष शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे पुढील पंतप्रधान बनणार आहेत. ते सध्या नॅशनल असेंब्लीचे विरोधी पक्षनेते आहेत. 1950 मध्ये लाहोरमध्ये एका उद्योगपती कुटुंबात जन्मलेले शाहबाज शरीफ हे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू आहेत. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानातील महत्त्वाच्या पंजाब प्रांताचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत.
इम्रान सरकार कस पडले?
शनिवारी अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यापूर्वी नॅशनल असेंब्लीमध्ये पाकिस्तानच्या ताज्या राजकीय परिस्थितीवर सुमारे 12 तास चर्चा झाली. रविवारी मध्यरात्री एक तास आधी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव यशस्वी झाला. 342 सदस्यांच्या सभागृहात 174 सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. इम्रान खान हे पाकिस्तानच्या इतिहासातील पहिले पंतप्रधान आहेत ज्यांना अविश्वास प्रस्तावाद्वारे पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या आधी 2006 मध्ये शौकत अझीझ आणि 1989 मध्ये बेनझीर भुट्टो अविश्वास ठरावातून वाचले होते.
काय म्हणाले शाहबाज?
विश्वासदर्शक ठरावाच्या घोषणेनंतर शाहबाज म्हणाले, 'मला जुन्या कटुतेकडे परत जायचे नाही. हे विसरून पुढे जावे लागेल. आम्ही कोणताही सूड किंवा अन्याय करणार नाही. आम्ही कुणालाही विनाकारण तुरुंगात पाठवणार नाही. विश्वासदर्शक ठरावाच्या निकालानंतर, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी देशाच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधानांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल सभागृहाचे अभिनंदन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.