

Mexico Gen Z Protest: नेपाळनंतर आता मेक्सिकोमध्येही तरुण पिढी सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन उभे करत आहे. देशातील वाढता गुन्हेगारी दर, भ्रष्टाचार आणि प्रशासनातील ढिलाई यामुळे मेक्सिकोच्या रस्त्यांवर सध्या हजारो तरुण उतरले असून ते सरकारविरोधात प्रचंड निदर्शने करत आहेत. सत्ताधारी पक्षावर ड्रग्ज कार्टेलशी हातमिळवणी केल्याचा आरोप Gen-Z कडून केला जात आहे.
शनिवारी (15 नोव्हेंबर) झालेल्या या देशव्यापी आंदोलनात विविध वयोगटातील लोक सामील झाले. आंदोलनात तरुणांसोबत विरोधी पक्षांतील लोकही मोठ्या संख्येने सहभागी झाले. मिचोआकान शहराचे महापौर कार्लोस मान्जो यांची नुकतीच हत्या झाली. मान्जो यांच्या हत्येमुळे लोकांमध्ये मोठा संताप असून त्यांचे समर्थकही या आंदोलनात मोठ्या संख्येने सामील झाले.
ऑक्टोबर 2024 पासून सत्तेत असलेल्या राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शीनबाम यांची लोकप्रियता पहिल्या वर्षात 70 टक्क्यांहून अधिक असली तरी, त्यांच्या सुरक्षा धोरणांवर अनेक बड्या हत्यांमुळे टीका होत आहे. मिचोआकानमधील उरुआपान शहराचे महापौर कार्लोस मान्जो यांची 1 नोव्हेंबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांनी त्यांच्या शहरात ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरोधात मोहिम राबवल्यामुळे ही हत्या करण्यात आली. याच हत्येने लोकांचा संताप वाढवला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेक्सिको (Mexico) सिटीमध्ये आंदोलक अधिक आक्रमक झाले. राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शीनबाम यांचे निवासस्थान असलेल्या नॅशनल पॅलेसच्या आसपास आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. पोलिसांनी केलेला बळाचा वापर आणि हिंसाचारामुळे जमाव आणखीनच उग्र बनला.
मेक्सिको सिटीचे सुरक्षा सचिव पाब्लो वाजक्वेज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या हिंसाचारात 100 पोलीस (Police) जखमी झाले, त्यापैकी 40 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. तसेच, 20 नागरिकही जखमी झाले. या प्रकरणी 20 जणांना अटक करण्यात आली, तर 20 जणांना प्रशासकीय गुन्ह्यांसाठी ताब्यात घेण्यात आले.
मेक्सिकन वृत्तवाहिनी 'एल युनिव्हर्सल' नुसार, जेव्हा आंदोलक नॅशनल पॅलेसच्या आवारात प्रवेश करत होते, तेव्हा सुरक्षा दलांनी त्यांच्यावर अश्रुधूर सोडला आणि दगडफेक केली. तसेच, सुरक्षा दलांनी दगडांच्या मदतीने 'झोकालो' परिसरात निदर्शने करणाऱ्या तरुणांवर हल्ला केला, ज्यात काही आंदोलक जखमी झाले.
राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शीनबाम यांचे ड्रग्ज कार्टेलसोबत संगनमत असल्याचा थेट आरोप Gen-Z करत आहेत. शीनबाम या अमेरिकेच्या धोरणांविरोधात भूमिका घेण्यासाठी आणि व्हेनेझुएलाला समर्थन देण्यासाठी ओळखले जातात. ट्रम्प यांच्या विरोधात उघडपणे बोलल्यामुळे त्यांची जगभर चर्चा झाली. मात्र आता, Gen-Z च्या या तीव्र विरोधामुळे राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया यांचे सरकार धोक्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.