तैपेई: चेक प्रजासत्ताकाच्या संसदेचे अध्यक्ष मिलॉस विस्त्रचील यांनी गुरुवारी सकाळी तैवानच्या अध्यक्ष त्साई इंग-वेन यांची भेट घेतली. चीनच्या इशाऱ्यानंतरही त्यांनी ही भेट घेतली.
बुधवारी तैवानच्या संसदेतील भाषणात आपण तैवानी असल्याचा उल्लेख विस्त्रचील यांनी केला होता. आज चेक संसदेचे दिवंगत अध्यक्ष यारोस्लाव कुबेरा यांच्यासाठीचे पदक त्साई यांनी विस्त्रचील यांना प्रदान केले.
हा दौरा आखण्यात कुबेरा यांनी पुढाकार घेतला होता, मात्र त्यांचे जानेवारीत आकस्मिक निधन झाले. त्साई यांनी, कुबेरा हे एक महान मित्र असल्याचा उल्लेख केला. त्याचवेळी विस्त्रचील यांचे संसदेतील भाषण अनेक तैवानी नागरिकांना भावले असल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला.
तैवान हा आपला प्रांत असल्याचा दावा चीन करतो. अनेक देशांचे तैवानशी औपचारिक राजनैतिक संबंध नाहीत. विस्त्रचील यांच्या दौऱ्यालाही चेकची अधिकृत मान्यता नाही. तरीही हा दौरा दुर्मीळ ठरला आहे.
तैवानी असो किंवा चेक, आपल्या कृतीद्वारे युरोप तसेच जगभरातील मित्रांना आपण हेच सांगतो आहोत की चीनच्या दडपशाहीसमोर आपण बळी पडणार नाही, तर निर्भयपणे आवाज उठवू, आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी सक्रीयसहभाग घेऊ आणि आपल्या क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी योगदान देऊ.
- त्साई इंग-वेन, तैवानच्या अध्यक्षा
मर्यादा ओलांडली
तैवानच्या दौऱ्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा चीनने दिला होता. गुरुवारी चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. चीनने चेक प्रतिनिधीला सांगितलेच पाहिजे की, तुम्ही मर्यादा ओलांडली आहे, असे ते म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.