

India Bangladesh Relations: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी'च्या (BNP) अध्यक्षा बेगम खालिदा झिया यांचे मंगळवारी (30 डिसेंबर) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनावर भारताने दुःख व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शोकसंदेश आणि भारत सरकारसह भारतीय जनतेच्या संवेदना घेऊन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर बुधवारी (31 डिसेंबर) विशेष विमानाने ढाका येथे पोहोचले. बांगलादेशच्या या कठीण काळात भारत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे जयशंकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर बुधवारी सकाळी 11:30 वाजता ढाका विमानतळावर पोहोचले, जिथे बांगलादेशातील भारताचे उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी त्यांचे स्वागत केले. भारताचे बांगलादेशातील उच्चायुक्त रियाज हामिदुल्लाह यांनी सोशल मीडियावर माहिती दिली की, जयशंकर यांनी पंतप्रधान मोदींचे पत्र सुपूर्द करताना खालिदा झिया यांच्या लोकशाहीतील योगदानाचे कौतुक केले. जयशंकर म्हणाले की, "खालिदा झिया यांनी बांगलादेशच्या राजकीय जडणघडणीत आणि लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील."
बेगम खालिदा झिया 80 वर्षांच्या होत्या. बांगलादेशच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचा राजकीय प्रवास चार दशकांहून अधिक काळ चालला. विशेष म्हणजे, त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या आणि त्यांनी तीन वेळा देशाचे नेतृत्व केले.
त्यांचा राजकारणातील प्रवेश हा कोणत्याही पूर्व नियोजित रणनीतीचा भाग नव्हता. 30 मे 1981 रोजी त्यांचे पती आणि तत्कालीन राष्ट्रपती झियाउर रहमान यांची लष्करी बंडाच्या प्रयत्नात हत्या झाली. या धक्कादायक घटनेनंतर वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच त्यांनी राजकारणाची धुरा सांभाळली. त्यानंतर सुमारे एका दशकानंतर त्या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या.
खालिदा झिया यांनी 'बीएनपी' या पक्षाची धुरा सांभाळत बांगलादेशच्या सत्तेवर आपली पकड मजबूत केली. त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे झाली असली, तरी त्यांच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात भ्रष्टाचाराच्या आरोपांनी त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला. आयुष्याची शेवटची काही वर्षे त्यांनी गंभीर आजारपण आणि कायदेशीर लढायांमध्ये घालवली. असे असूनही, बांगलादेशच्या जनमानसावर आणि तेथील राजकारणावर त्यांचा मोठा प्रभाव राहिला आहे.
भारताने व्यक्त केलेला हा शोक केवळ औपचारिक नसून, शेजारील राष्ट्राशी असलेले दृढ संबंध आणि एका ज्येष्ठ लोकशाहीवादी नेत्याप्रती असलेला आदर दर्शवणारा आहे. जयशंकर यांचा हा दौरा बांगलादेशच्या जनतेला या दुःखाच्या प्रसंगी धीर देणारा ठरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.