

Japan Earthquake 7 Point 1 Magnitude Kyushu: जपानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा धडकी भरवणारा धक्का बसल्याने एकच खळबळ उडाली. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.1 इतकी नोंदवली गेली असून, या तीव्रतेमुळे जपानच्या किनारपट्टीवर महाकाय त्सुनामी येण्याचा गंभीर धोका निर्माण झाला. भूकंपशास्त्रज्ञांनी तातडीने समुद्रात एक मीटरपेक्षा जास्त उंचीच्या त्सुनामी लाटा उसळण्याचा इशारा दिला. त्याचवेळी समुद्रात अचानक निर्माण झालेल्या अजस्र लाटा पाहून प्रशासनाने किनारपट्टीच्या भागातील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश दिले. तसेच पर्यटकांनाही बंदिस्त व सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना दिल्या.
जपान हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या शक्तिशाली भूकंपाचा झटका दक्षिण जपानमधील क्युशू बेटावरील कुमामोटो परिसरात सर्वाधिक जाणवला. या भूकंपाचे केंद्र समुद्राच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर (सुमारे 6 मैल) खोलीवर होते. त्सुनामीच्या धोक्यामुळे स्थानिक प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा तातडीने सक्रिय झाल्या असून खबरदारीचे उपाय योजले जात आहेत. सुदैवाने, या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवित किंवा मोठ्या वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही, परंतु मदत आणि बचाव पथके प्रत्यक्षात मैदानात उतरुन परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जपानच्या (Japan) पंतप्रधान कार्यालयाने कुमामोटो, नागासाकी, कागोशिमा, फुकुओका, सागा, ओइता आणि मियाझाकी या राज्यांमध्ये आणीबाणी घोषित केली. पोलिसांना स्थानिक प्रशासनासोबत संयुक्तपणे मदतकार्य वेगाने राबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
भौगोलिकदृष्ट्या जपान हा प्रशांत महासागराच्या ‘रिंग ऑफ फायर’ क्षेत्रात वसलेला देश आहे, जिथे जगातील तब्बल 90 टक्के भूकंप होतात. जपानची रचना प्रशांत, फिलीपिन्स महासागर, युरेशियन आणि उत्तर अमेरिकन अशा 4 प्रमुख टेक्टोनिक प्लेट्सवर झाली आहे. या प्लेट्स जेव्हा परस्परांवर आदळतात किंवा एकमेकांच्या खाली सरकतात, तेव्हा प्रचंड ऊर्जा निर्माण होऊन पृथ्वी हादरते. जपानच्या समुद्रात 'सबडक्शन' प्रक्रियेदरम्यान जड टेक्टोनिक प्लेट हलक्या प्लेटच्या खाली धसते, ज्यामुळे खडकांवर प्रचंड दाब निर्माण होतो आणि ही साचलेली ऊर्जा जेव्हा बाहेर पडते, तेव्हा संपूर्ण भूभाग हादरवून टाकणाऱ्या भूकंपीय तरंगांची निर्मिती होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.