Ivanka Trump Assassination Plot: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट उधळला, अमेरिकेत इराणी दहशतवाद्याला अटक; आलिशान बंगल्याची ब्लूप्रिंट जप्त VIDEO

IRGC Terrorist Arrested US: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबाला हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर आली.
Ivanka Trump Assassination Plot
Ivanka TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

Ivanka Trump Assassination Plot Foiled: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबाला हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर आली. ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा एक मोठा आंतरराष्ट्रीय कट अमेरिकेच्या गुप्तहेर आणि तपास यंत्रणांनी उधळून लावला. इवांका ट्रम्प यांच्या हत्येच्या या भयानक कटामागे इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स' या सरकारी सुरक्षा यंत्रणेचा आणि इराण समर्थित दहशतवादी नेटवर्कचा हात असल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी अमेरिकन सुरक्षा दलांनी एका संशयित दहशतवाद्याला अटक केली असून ट्रम्प यांचे संपूर्ण कुटुंब इराणच्या निशाण्यावर असल्याचा खळबळजनक खुलासा तपास यंत्रणांनी केला.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या 32 वर्षीय आरोपीचे नाव मोहम्मद बाकर साद दाऊद अल-सादी असून तो मूळचा इराकचा रहिवासी आहे. अमेरिकन यंत्रणांनी केलेल्या चौकशीत त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सुमारे 6 वर्षांपूर्वी अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात इराणचे (Iran) लष्करी कमांडर कासिम सुलेमानी मारले गेले होते.

अल-सादी हा सुलेमानी यांना आपला गुरु मानत होता आणि त्यांच्याच मृत्यूचा बदला घेण्यासाठी तो ट्रम्प कुटुंबाला संपवण्याच्या प्रयत्नात होता. यासाठी त्याने इराणच्या 'IRGC' कडून विशेष प्रशिक्षण घेतले होते आणि इराण सरकार तसेच तिथल्या लष्कराच्या मदतीनेच तो अमेरिकेत पोहोचला होता. कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूच्या दिवसापासूनच तो ट्रम्प यांच्या कुटुंबावर पाळत ठेवून होता.

इवांका ट्रम्प यांच्या हत्येचे गांभीर्य तेव्हा अधिक वाढले जेव्हा सुरक्षा दलांनी अल-सादी याच्या लपण्याच्या ठिकाणावर छापा टाकला. या सर्च ऑपरेशन दरम्यान त्याच्याकडून फ्लोरिडा येथील इवांका ट्रम्प यांच्या आलिशान घराची 'ब्लूप्रिंट' जप्त करण्यात आली. तो बऱ्याच काळापासून फ्लोरिडामध्ये राहून इवांका यांच्या घराची रेकी करत होता. मात्र, त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे सुरक्षा रक्षकांना संशय आला आणि त्याला वेळेतच बेड्या ठोकण्यात आल्या.

वॉशिंग्टनमधील इराक दूतावासाचे माजी डेप्युटी मिलिटरी अटॅची एंतिफाध कनबर यांनीही या घटनेला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर मोहम्मद अल-सादी हा अमेरिकेत जाण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होता. 'मला इवांका ट्रम्प यांना मारायचे असून ट्रम्प यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करायचे आहे,' असे तो आपल्या ओळखीच्या लोकांजवळ उघडपणे बोलायचा. ज्याप्रमाणे अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्याने कमांडर सुलेमानी यांना संपवले, अगदी त्याचप्रमाणे ट्रम्प यांचे घर जाळून राख करण्याची त्याची योजना होती. सुदैवाने, अमेरिकेच्या सतर्क गुप्तहेर यंत्रणांमुळे हा भीषण आंतरराष्ट्रीय कट वेळेतच उधळला गेला असून ट्रम्प कुटुंबाची सुरक्षा आता आणखी वाढवण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com