Israel-Hamas Conflict: इस्राइल-हमास संघर्ष दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ७ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या या संघर्षात आत्तापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. हमासने इस्राइलवर अचानक हल्ले करुन इस्राइलच्या नागरिकांना ओलीस ठेवले होते. त्यानंतर इस्राइलने युद्ध घोषित केले आहे.
पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासच्या लष्करी शाखेने शनिवारी सांगितले की गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे 60 हून अधिक ओलीस बेपत्ता झाले आहेत. अल-कासम ब्रिगेडचे प्रवक्ते अबू उबैदा यांनी हमासच्या टेलिग्राम खात्यावर सांगितले की, बेपत्ता झालेल्या 60 इस्रायली ओलीसांपैकी 23 मृतदेह ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
त्याच वेळी, पॅलेस्टिनी वृत्तसंस्थेने गाझा निर्वासित छावणीवर इस्रायली बॉम्बहल्ल्यात 51 लोक मारले गेले, ज्यात मुख्यतः मुले आणि महिलांचा समावेश असल्याची माहीती दिली आहे. दरम्यान, इस्रायली लष्कराच्या कारवाईत आतापर्यंत 9 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याचा दावा गाझा आरोग्य मंत्रालयाने केला आहे.
दरम्यान, इस्राइलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी हे युद्ध आत्ताच थांबणार नाही. जोपर्यंत इस्राइलच्या नागरिकांना सोडवत नाही तोपर्यंत हे युद्ध चालूच राहणार आहे. गाझा पट्टीतील दळणवळण, इंटरनेट बंद केले आणि इंधन याचा पुरवठा बंद केला जाईल असे म्हटले आहे.
संपूर्ण जगभरातून हे युद्ध थांबावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संयुक्त राष्ट्रानेदेखील हे युद्ध थांबावावे असे आवाहन केले आहे. आता हा संघर्ष कधी थांबणार आणि यामध्ये किती नागरिकांना आपला प्राण गमवावा लागणार याची चिंता संपूर्ण जगाला लागली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.