Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील एक आठवड्याचा युद्धविराम संपुष्टात येताच गाझामध्ये पुन्हा विध्वंस सुरु झाला आहे. शुक्रवारी हा युद्धविराम संपताच इस्रायलने पुन्हा हल्ले सुरु केले. शनिवारी आणि रविवारी त्यांनी इतके मिसाईल हल्ले केले की, अवघ्या दोन दिवसांत 700 लोकांचा मृत्यू झाला. एवढेच नाही तर गाझामधील कोणत्याही भागात राहणे आता सुरक्षित नसल्याचे एजन्सींचे म्हणणे आहे. इस्रायली सैन्य आता उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूंनी गाझावर हल्ले करत आहे. इस्रायलचे चीफ ऑफ जनरल स्टाफ हर्झी हेलेवी यांनी सांगितले की, त्यांचे सैन्य दोन्ही दिशांनी हल्ले करत आहे.
दरम्यान, इस्रायली सैनिकांनी आठवड्याच्या शेवटी दोन्ही बाजूंनी हल्ले केले आहेत. इतकेच नाही तर इस्त्रायल हवाई हल्ले करत असतानाच इस्रायली सैनिकही अनेक भागात जमिनीवरुन चढाई करत आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 15,500 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 280 वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात 7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरु आहे. या दिवशी हमासने इस्रायलवर हल्ला केला. मात्र, ओलीस आणि कैद्यांच्या देवाणघेवाणीसाठी दोघांमध्ये आठवडाभरापासून युद्धविराम सुरु होता, तो आता संपुष्टात आला आहे.
दुसरीकडे, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाचे म्हणणे आहे की गाझामध्ये आता लोक आश्रय घेऊ शकतील असे कोणतेही क्षेत्र उरले नाही. इस्रायलने गाझामधील जबलिया भागात एका 6 मजली इमारतीवरही हल्ला केल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या इमारतीत निर्वासित राहत होते. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात लोक मारले गेल्याचे बोलले जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या नव्या अंदाजानुसार, गाझातील 75 टक्के लोकसंख्या म्हणजेच 18 लाख लोकांना पलायन करावे लागले आहे. हे लोक अतिशय वाईट परिस्थितीत जगत आहेत, जिथे त्यांना अन्नापासून शौचास जाण्यापर्यंतच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
तसेच, युद्धविराम संपल्यानंतर इस्रायलने हमासची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरु केले आहेत. हमासचा नायनाट व्हायला हवा, असे इस्रायलचे म्हणणे आहे. तो आपल्या अस्तित्वाला धोका आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल, असे इस्रायलचे म्हणणे आहे. यापूर्वीही, नेतन्याहू यांनी हमासच्या धोक्याला कमी लेखणे ही आमची चूक असल्याचे म्हटले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.