

Hey Stupid Trump Message on Iranian Missiles: मध्यपूर्वेतील संघर्ष आता सर्व मर्यादा ओलांडून एका अत्यंत वैयक्तिक आणि अपमानजनक वळणावर पोहोचला आहे. इराणने इस्रायल आणि अरब देशांवर क्षेपणास्त्रांचा भीषण वर्षाव सुरु केला असून या हल्ल्यापूर्वी इराणने केलेल्या एका कृत्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 'पाषाण युगात' (Stone Age) पाठवण्याची धमकी दिल्यानंतर, इराणने आपल्या मिसाइल्सवर ट्रम्प यांना उद्देशून अत्यंत अर्वाच्य आणि अपमानजनक संदेश लिहिल्याचे समोर आले.
इराणी लष्कराने जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये काही जवान बॅलिस्टिक मिसाइल्सवर मार्करने संदेश लिहिताना दिसत आहेत. यावर "Hey, Stupid Trump" असे स्पष्टपणे लिहिलेले असून पुढे "होर्मुजची सामुद्रधुनी तुमच्या तोंडापेक्षा मोठी आहे" असा उपरोधिक टोलाही लगावण्यात आला. व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्या फोटोंचे विद्रुपीकरण करुन ते मिसाइल्सवर चिकटवल्याचेही दिसून येत आहे. ट्रम्प यांच्या 'बडबोलेपणाला' आणि त्यांनी दिलेल्या धमकीला हे इराणचे चोख प्रत्युत्तर असल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटले.
हा प्रकार डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच दिलेल्या त्या अल्टिमेटमनंतर घडला, ज्यात त्यांनी इराणला होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी 10 दिवसांची मुदत दिली होती. "इराणने जर शांतता करार केला नाही, तर आम्ही त्यांचे वीज प्रकल्प, पूल आणि पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करुन त्यांना पुन्हा पाषाण युगात नेऊन सोडू," असे ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले होते. मात्र, ट्रम्प यांच्या या इशाऱ्याला न जुमानता इराणने (Iran) थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा अपमान करत मिसाइल हल्ले अधिक तीव्र केले आहेत.
या संघर्षाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर अत्यंत भीषण परिणाम होताना दिसत आहे. होर्मुजची सामुद्रधुनी बंद होण्याच्या भीतीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठला असून जगभरात ऊर्जा संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियनने दोन्ही बाजूंना संयम राखण्याचे आवाहन केले असले तरी, सध्या कोणतीही मुत्सद्देगिरी काम करताना दिसत नाही. अमेरिकेने (America) इराणच्या भूगर्भातील तळांवर बंकर-बस्टर बॉम्बने हल्ले सुरु ठेवले असून इराणनेही आता थेट ट्रम्प यांना आव्हान दिल्याने मध्यपूर्वेतील हे युद्ध जागतिक महायुद्धाच्या दिशेने सरकत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.