America Crime: अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, बेपत्ता अब्दुलचा मृतदेह सापडला; या वर्षातील 11वी घटना

America Crime News: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ले कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. टार्गेट करुन हे हल्ले केले जात आहेत.
America Crime News
America Crime NewsDainik Gomantak

America Crime News: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ले कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. टार्गेट करुन हे हल्ले केले जात आहेत. यातच आता, आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा संशयास्पद परिस्थिती मृत्यू झाल्याची घटना अमेरिकेतून समोर आली आहे. न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने मंगळवारी या दुःखद वृत्ताला दुजोरा दिला. हैदराबादचा 25 वर्षीय विद्यार्थी मोहम्मद अब्दुल अराफत ओहायोमध्ये मृतावस्थेत आढळून आल्याचे सांगण्यात आले. त्याने 2023 मध्ये क्लीव्हलँड स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. काही दिवसांपूर्वी मोहम्मद अब्दुल अराफात बेपत्ता झाल्याची बातमी आली होती. भारतीय दूतावासाने याबाबत सांगितलेही होते की, अब्दुलचा शोध त्याचे कुटुंब आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सुरु आहे.

दरम्यान, भारतीय दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात अब्दुल अराफात याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, 'मोहम्मद अब्दुल अराफात याचा काही दिवसांपासून शोध घेण्यात येत होता. मात्र तो क्लीव्हलँड, ओहायो येथे मृतावस्थेत आढळून आल्याचे समजले. मोहम्मद अराफात याच्या कुटुंबीयांप्रती आमच्या संवेदना आहेत. अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूची ही 11वी घटना असल्याची माहिती आहे. याबाबत मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यासाठी ते स्थानिक एजन्सींच्या संपर्कात असल्याचे वाणिज्य दूतावासाने सांगितले. दूतावासाने सांगितले की, 'त्याचे पार्थिव भारतात आणण्यासाठी आम्ही शोकाकूल कुटुंबाला सर्वतोपरी मदत करत आहोत.'

America Crime News
America Crime: अमेरिकेत भारतीयांच्या मृत्यूचं सत्र थांबेना! आणखी एका विद्यार्थ्याला गमवावा लागला जीव

वडिलांशी शेवटचा 7 मार्च रोजी बोलला होता

अराफतचे वडील मोहम्मद सलीम यांनी सांगितले होते की, त्यांचा मुलगा त्यांच्याशी 7 मार्च रोजी शेवटचा बोलला होता. तेव्हापासून तो त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात नाही. त्याचा मोबाईलही बंद असल्याचे त्याने सांगितले होते. अराफतच्या अमेरिकेतील रुममेटने त्याच्या वडिलांना क्लीव्हलँड पोलिसांकडे बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केल्याची माहिती दिली होती. दरम्यान, 19 मार्च रोजी अराफतच्या कुटुंबाला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला ज्याने दावा केला होता की अराफत याचे ड्रग टोळीने अपहरण केले आहे. त्याच्या सुटकेसाठी या टोळीने US$1,200 ची मागणी केली होती. त्याच्या वडिलांनी सांगितले की, कॉलरने खंडणी न दिल्यास अराफतची किडनी विकण्याची धमकीही दिली होती.

America Crime News
America Crime News: धक्कादायक! ट्रेन अपघातात मृत व्यक्तीचा तुटलेला पाय घेऊन गेला माथेफिरु, अन्...

वडिलांकडे फोनवरुन खंडणीची मागणी करण्यात आली

सलीम यांनी हैदराबादमध्ये पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले होते की, 'मला एका अनोळखी नंबरवरुन फोन आला आणि कॉलरने मला सांगितले की माझ्या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे आणि त्याने पैशांची मागणी केली आहे. मात्र, फोन करणाऱ्याने पैसे कसे द्यायचे हे सांगितले नाही. त्याने फक्त ठराविक रक्कम खंडणीच्या स्वरुपात देण्यास सांगितले. जेव्हा मी कॉलरला माझ्या मुलाशी बोलणे करुन देण्याची विनंती केली तेव्हा त्याने तसे करण्यास नकार दिला.'' गेल्या आठवड्यात ओहायो येथे उमा सत्य साई गडदे या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com