Sudan Crisis: सुदानमधील संघर्षांदरम्यान एका भारतीयाचा मृत्यू!
Sudan Power Struggle Between Army Paramilitaries: सुदानची राजधानी खार्टूममध्ये रॅपिड सपोर्ट फोर्स आणि देशाच्या लष्करामध्ये अनेक दिवसांच्या तणावानंतर परिस्थिती अनियंत्रित झाली आहे.
देशभरात सातत्याने गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, लष्कराच्या मुख्यालयाजवळ गेल्या अनेक तासांपासून गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.
सुदानीज डॉक्टर्स युनियनच्या म्हणण्यानुसार, लष्कर आणि रॅपिड सपोर्ट फोर्स (आरएसएफ) यांच्यातील रक्तरंजित संघर्षात 183 लोक जखमी झाले आहेत. यातच, सुदानमधील सत्तासंघार्षादरम्यान एका भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
दरम्यान, सुदानमध्ये (Sudan) सुरु असलेल्या संघर्षांदरम्यान एका गोळीने जखमी झालेल्या अल्बर्ट ऑगस्टिन नावाच्या भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. खार्टूममधील भारतीय दूतावासाने सांगितले की, आम्ही मृत व्यक्तीसाठी पुढील व्यवस्था करण्यासाठी कुटुंब आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.
गृहयुद्धासारखी परिस्थिती असताना सत्तापालट होण्याची शक्यता आहे.
सुदानमध्ये सत्तापालट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे लष्कर आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्स यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत 30 हून अधिक लोक ठार झाले आहेत.
मृतांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. खार्टूमसह, ओमदुरमन, न्याला, एल ओबेद आणि एल फाशर या शहरांमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. ही शहरे राजधानी खार्तूमच्या पश्चिमेस आहेत.
निमलष्करी दल आणि लष्कर यांच्यात संघर्ष का?
सुदानमध्ये लष्कराने सत्तापालट केला होता, तेव्हापासून ते सार्वभौम परिषदेच्या माध्यमातून देश चालवत आहे.
तर आरएसएफची कमान कौन्सिलचे उपाध्यक्ष जनरल मोहम्मद हमदान डागलो यांच्याकडे आहे. लष्कराचे नेतृत्व जनरल अब्देल फताह अल-बुरहान यांच्याकडे आहे, जे सार्वभौम परिषदेचे प्रमुख आहेत.
लष्कर आणि आरएसएफमधील शत्रुत्व हे सत्तेतून पदच्युत करण्यात आलेल्या राष्ट्राध्यक्ष ओमर अल-बशीर यांच्या राजवटीच्या काळातील आहे.
भारतीयांसाठी अॅडवायझरी
भारतीय परराष्ट्र मंत्रालय सुदानमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. त्याचवेळी भारतीय दूतावासाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, 'सर्व भारतीयांना अलर्ट - सुदानमधील गोळीबार आणि संघर्ष पाहता, तुम्हाला खबरदारी घेण्याचा, घरातच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. बाहेर पडणे थांबवा. घाबरु नका आणि अधिक माहितीची प्रतीक्षा करा.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.