

India Slams Pakistan At UNSC: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या उच्चस्तरीय बैठकीत भारताने पुन्हा एकदा पाकड्यांचा बुरखा फाडला. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील जनतेच्या मूलभूत हक्कांचे होणारे दमन आणि स्वातंत्र्याची पायमल्ली यावर भारताने तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी आणि राजदूत हरीश परवथानेनी यांनी स्पष्ट केले की, पीओकेमधील नागरिकांवर गेल्या आठ दशकांपासून होणारा अन्याय ही कोणतीही वेगळी घटना नसून, पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांनी आखलेल्या एका मोठ्या षड्यंत्राचा भाग आहे.
भारताने (India) अत्यंत आक्रमकरित्या भूमिका मांडताना सांगितले की, पाकिस्तान केवळ पीओकेमध्येच नव्हे तर स्वतःच्या देशातही लोकशाहीचा गळा घोटत आहे. माजी मुख्यमंत्र्यांसारख्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात डांबणे, मुख्य विरोधी पक्षांवर निवडणुकीत बंदी घालणे आणि 27व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून सैन्याने केलेला घटनात्मक तख्तापलट यांसारख्या गोष्टींमुळे पाकिस्तानमधील लोकशाहीचे अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात आले.
जागतिक समुदायाचे लक्ष वेधण्यासाठी आणि देशांतर्गत अपयश लपवण्यासाठी पाकिस्तान सातत्याने धार्मिक चिन्हांचा गैरवापर करुन बनावट कहाण्या रचत असतो, असा थेट आरोपही भारताने केला. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा गैरवापर करुन खोटी माहिती पसरवण्याऐवजी स्वतःच्या देशातील गंभीर समस्यांकडे लक्ष देऊन आत्मपरीक्षण करावे, असा कडक सल्लाही यावेळी भारतीय राजदूत हरीश परवथानेनी यांनी दिला.
या महत्त्वाच्या चर्चेदरम्यान भारताने जम्मू-काश्मीरबाबत आपली राष्ट्रीय भूमिका पुन्हा एकदा अत्यंत ठामपणे मांडली. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अभिन्न भाग होता, आहे आणि सदैव राहील, ही एक संवैधानिक आणि कायदेशीर वास्तविकता आहे, जी पाकिस्तान जाणीवपूर्वक नाकारण्याचा प्रयत्न करतो. जम्मू-काश्मीरशी संबंधित एकमेव प्रलंबित आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताच्या सार्वभौम भूभागावर पाकिस्तानने केलेला बेकायदेशीर कब्जा खाली करणे हाच आहे. जागतिक व्यासपीठावर स्वतःचा भारतविरोधी अजेंडा रेटण्याच्या पाकिस्तानच्या निष्फळ प्रयत्नांना भारताच्या या सडेतोड उत्तरामुळे पुन्हा एकदा सुरुंग लागला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.