

Houthi Missile Attack Saudi Arabia Pakistan Reaction: मध्य पूर्वेत हूती बंडखोरांच्या वाढत्या आक्रमक कारवायांमुळे आणि त्यांनी थेट सौदी अरबवर केलेल्या ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या गोटात प्रचंड अस्वस्थता आहे. हूतींनी सौदीवर केलेल्या या भीषण हल्ल्यात तब्बल 73 नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर सौदीने यमनमधील हूतींच्या तळांवर हवाई प्रतिहल्ले चढवून चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, सौदीवर हल्ला होताच पाकिस्तानने तातडीने आक्रमक भूमिका घेत थेट इराणला कडक इशारा दिला. पाकिस्तानने इराणला हूती बंडखोरांवर नियंत्रण ठेवण्यास सांगितले असून, सौदी अरबसोबत असलेल्या आपल्या ऐतिहासिक संरक्षण कराराचा हवाला दिला.
पाकिस्तान आणि सौदी यांच्यात नुकताच द्विपक्षीय संरक्षण करार झाला. या करारांतर्गत जर सौदीच्या सुरक्षेवर किंवा भौगोलिक अखंडतेवर कोणतेही संकट आले, तर पाकिस्तानला लष्करीदृष्ट्या मदतीला धावून जाणे भाग पडते. त्यामुळेच पाकिस्तानने इराणला स्पष्ट शब्दात बजावले की, इराणने आपल्या प्रभावाचा वापर करुन हूतींना लवकरात लवकर रोखावे; अन्यथा हा संरक्षण करार सक्रिय होऊन संपूर्ण क्षेत्रातील परिस्थिती अधिक गंभीर आणि अनियंत्रित होऊ शकते.
हूती बंडखोरांना इराणकडून आर्थिक आणि शस्त्रास्त्रांचे समर्थन मिळत असल्याचा आरोप दीर्घकाळापासून केला जात आहे, ज्यामुळे पाकिस्तानने थेट तेहरानकडे बोट दाखवले. दुसऱ्या बाजूला, हूती बंडखोरांनी यमनमधील अत्यंत महत्त्वाच्या 'मोचा' शहरावर ताबा मिळवला. मोचा हे लाल समुद्राजवळ बसलेले अत्यंत मोक्याचे आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे बंदर आहे. या शहरावर ताबा मिळाल्यामुळे हूतींची बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीपर्यंत थेट पोहोच वाढली, जो लाल समुद्र आणि अदेनच्या खाडीला जोडणारा जागतिक सागरी व्यापाराचा अत्यंत महत्त्वाचा महामार्ग आहे.
यामुळे आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीवर आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर मोठे संकट निर्माण झाले. यमनमधील हा संघर्ष आता केवळ प्रादेशिक उरलेला नसून, इराण, पाकिस्तान, सौदी आणि हूती बंडखोरांमधील हा तणाव महायुद्धाचे रुप धारण करतो की काय, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.