

Donald Trump Tariff Cut: जागतिक व्यापार आणि आर्थिक धोरणांना मोठी कलाटणी देणारा एक धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला. अमेरिकन प्रशासनाने कृषी आणि औद्योगिक उपकरणांच्या आयातीवर लावण्यात येणाऱ्या टॅरिफमध्ये 10 टक्क्यांची मोठी कपात करण्याची घोषणा केली. या नव्या बदलामुळे आता या अत्यंत महत्त्वाच्या वस्तूंवरील आयात शुल्काचे दर सध्याच्या 25 टक्क्यांवरुन थेट 15 टक्क्यांवर येणार आहेत.
व्हाईट हाऊसने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, ही टॅरिफ कपात तात्पुरत्या स्वरुपात डिसेंबर 2027 पर्यंत लागू राहणार आहे. अमेरिकेतील स्थानिक उत्पादकांचा उत्पादन खर्च कमी करणे, देशांतर्गत कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीला वेग देणे आणि देशाचा औद्योगिक पाया पुन्हा एकदा मजबूत करणे हा या ऐतिहासिक निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. या नवीन धोरणामुळे शेतीकामात मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी अवजारे जसे की कंबाइन, हार्वेस्टर आणि इतर कृषी यंत्रांवर आता 25 टक्क्यांऐवजी केवळ 15 टक्के आयात शुल्क आकारले जाईल.
यामुळे अमेरिकन शेतकऱ्यांना आणि कृषी उत्पादकांना खूप मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. यासोबतच, अमेरिकेच्या व्यापार कराराच्या कक्षेत येणाऱ्या देशांमधून आयात केल्या जाणाऱ्या बुलडोझर, फोर्कलिफ्ट आणि इतर तत्सम औद्योगिक वाहनांवर (मोबाईल इंडस्ट्रियल मशिनेरी) आता पूर्वीपेक्षा कमी शुल्क मोजावे लागणार आहे.
या धोरणामध्ये देशांतर्गत धातू उत्पादनाला चालना देण्यासाठी एक विशेष आणि अनोखा नियम जोडण्यात आला. जर एखाद्या परदेशी उत्पादकाने अशा भांडवली उपकरणांची (कॅपिटल इक्विपमेंट) आयात केली, ज्यामध्ये वजनाच्या दृष्टीने किमान 85 टक्के स्टील किंवा ॲल्युमिनियम हे अमेरिकन मूळचे असेल, तर त्यांना केवळ 10 टक्के या सर्वात कमी टॅरिफ रेटचा लाभ घेता येईल. मात्र, यासाठी एक कडक अट घालण्यात आली; ती म्हणजे या उपकरणांमध्ये वापरलेले स्टील आणि ॲल्युमिनियम हे अमेरिकेच्या हद्दीतच वितळवलेले असावे.
आयात शुल्कात केलेला हा ताजा बदल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या त्या नवीन आदेशाचा भाग आहे, जो धातूंशी संबंधित सध्याच्या व्यापार उपायांमध्ये सुधारणा करतो. हा धोरणात्मक निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंता दूर करण्यासोबतच कृषी, गृहनिर्माण आणि मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या अमेरिकेच्या मुख्य क्षेत्रांना एक नवी ऊर्जा देईल, असा विश्वास व्हाईट हाऊसने व्यक्त केला. ट्रम्प यांनी आयात केलेले ॲल्युमिनियम, स्टील आणि तांब्यावरील टॅरिफचा प्रभावी वापर करुन अमेरिकेची (America) राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रमुख उद्योगांची आर्थिक ताकद सुनिश्चित केली.
परदेशातून येणाऱ्या कमी किमतीच्या आणि असुरक्षित आयातीच्या धोक्यापासून अमेरिकन कुटुंबे, स्थानिक समुदाय आणि व्यवसाय यांचे आर्थिक हित रक्षण करण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आल्याचे व्हाईट हाऊसच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.