India Canada Relations: गेल्या काही दिवसांत भारत आणि कॅनडामधील संबंध कमालीचे ताणले गेले आहे. खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. त्यानंतर दोन्ही देशातील संबंधात कटुता आली. यातच आता, ट्रूडो यांनी पुन्हा एकदा धक्कादायक वक्तव्य केले आहे.
भारत आणि कॅनडा हे लोकशाही प्रधान देश असल्याचे जस्टिन ट्रूडो यांनी म्हटले आहे. या दोन्ही देशांनी एकत्र वाटचाल केली पाहिजे, परंतु हरदीपसिंग निज्जरच्या हत्येकडे आपण दुर्लक्ष करु शकत नाही, असे ट्रुडो म्हणाले. गेल्या वर्षी 18 जून रोजी कॅनडातील सरे येथे खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जरची अज्ञात व्यक्तींकडून हत्या करण्यात आली होती. मात्र, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी यासाठी भारतीय एजंटना जबाबदार धरले होते.
दरम्यान, एका पंजाबी वृत्तवाहिनीशी बोलताना ट्रुडो म्हणाले की, ‘’भारत आणि कॅनडा हे लोकशाही प्रधान देश आहेत. या दोन्ही देशांनी एकत्र वाटचाल केली पाहिजे. दोन्ही देशांचे चांगले संबंध असायला हवेत, पण हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमुळे एक समस्या निर्माण झाली आहे, ज्याकडे आपण दुर्लक्ष करु शकत नाही.’’
काही दिवसांपूर्वीच ट्रुडो यांनी खालसा दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित केले होते. या कार्यक्रमाला खलिस्तान समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एवढेच नाही तर या कार्यक्रमात या लोकांनी भारतविरोधी बॅनरही झळकावले होते. या लोकांच्या हातात खलिस्तानी झेंडेही होते. विशेष म्हणजे, जेव्हा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) या कार्यक्रमात पोहोचले तेव्हा तिथे उपस्थित खलिस्तानी समर्थकांनी भारतविरोधी घोषणाही देण्यास सुरुवात केली होती.
इतकंच नाही तर जस्टिन ट्रूडो यांनी आपण खलिस्तानसोबत आहोत, परंतु यासाठी शांततापूर्ण आंदोलन करावे लागेल, असे ते म्हणाले होते. ट्रुडो म्हणाले की, ‘’तुमचे ओपिनियन काहीही असो, आम्ही त्याचे समर्थन करतो. कारण कॅनडा हा एक स्वतंत्र देश आहे, परंतु तुम्हाला शांततापूर्ण निषेध करावा लागेल.’’ एवढेच नाही तर खलिस्तानी घटकांवर भारताच्या आक्षेपाबाबत ट्रुडो म्हणाले की, ‘आमचे काम राजकीय आंदोलन थांबवणे नाही.’ दुसरीकडे, जस्टिन ट्रुडो यांच्या उपस्थित कार्यक्रमात देण्यात आलेल्या खलिस्तान समर्थक घोषणांवर भारताने कॅनडाच्या उपउच्चायुक्तांकडे नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, भारताने (India) याविषयी फटकारल्यानंतरही कॅनडाच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. ट्रूडो म्हणाले की, 'जर सहकारी देशांनी हिंसाचार आणि गुन्हेगारीबद्दल तक्रार केली तर आम्ही कारवाई करतो. पण भारत सरकार म्हणतंय तसं आम्ही कोणाच्या मागे जात नाही.’ अशा प्रकारे जस्टिन ट्रुडो यांनी आपण आपल्या भूमिकेवरुन मागे हटणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही दहशतवाद, हिंसाचार आणि धमकीच्या विरोधात आहोत.’ ट्रूडो शेवटी म्हणाले की, ‘भारत आमचा मोठा पाटर्नर आहे. मात्र हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमुळे संबंधांत कटुता आली आहे.’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.