India Canada Tension: हरदीप सिंग निजरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामधील संबंध सध्या कमालीचे ताणले गेले आहेत. खलिस्तानबाबत कॅनडातील वाढत्या निदर्शनांबाबत भारताकडून सातत्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यातच आता, भारताने पुन्हा एकदा कॅनडाला फटकारले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, कॅनडा काही वर्षांपासून आपल्या राजकारणात दहशतवाद्यांना स्थान देत आहे.
दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी गेल्या वर्षी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचा संबंध भारताशी जोडला होता. मात्र या प्रकरणात भारताने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आता या प्रकरणी परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, 'कॅनडाने या प्रकरणाबाबत त्यांच्याकडे असलेली माहिती शेअर करण्याच्या भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले आहे.' कॅनडाने भारतावर केलेल्या आरोपांच्या पाठीमागे तेथील राजकारणातील वाढता दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे जयशंकर यांनी नमूद केले.
'एनडीटीव्ही'शी बोलताना परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, "गेल्या काही वर्षांपासून कॅनडाच्या राजकारणातील दहशतवाद्यांचा वाढता सहभाग चिंतेचा विषय आहे. विशेष म्हणजे, हा त्यांच्या राजकारणाचा कमजोरपणा दर्शवतो असे मला वाटते. त्यामुळे तिथे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जे असे व्हायला नको होते." ते पुढे म्हणाले की, ''त्यांच्या पंतप्रधानांनी जाहीरपणे आमच्यावर आरोप केले आहेत. त्याआधी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची भेट झाली होती, तिथे मीही उपस्थित होतो. आम्ही म्हणालो होतो की, तुम्हाला काही समस्या असल्यास कृपया आम्हाला सांगा. तुम्हाला सर्व काही सांगायचे नसेल तर किमान काही गोष्टी सांगा, जेणेकरुन आम्ही आमचा तपास करु शकू.''
जयशंकर पुढे म्हणाले की, ''कॅनडाच्या पंतप्रधानांनी यावर आमच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही. मात्र, नंतर सार्वजनिकरित्या त्यांनी आरोप केले. दुसरीकडे, अमेरिकेकडे पाहा. अमेरिकेने आम्हाला कळवले की, त्यांच्याकडे गुन्हेगारांबद्दल काही माहिती आहे आणि ते आम्हाला आमच्या बाजूने पाहण्यासाठी काही माहिती देतील आणि नंतर आम्ही या प्रकरणाचा तपास करु.'' परराष्ट्र मंत्र्यांनी मुलाखतीत सांगितले की, ''कॅनडाच्या राजकारणात अलिप्ततावाद, दहशतवादी आणि हिंसाचाराला स्थान देण्यात आले आहे, तर अमेरिकेत अशी कोणतीही समस्या नाही.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.