

Egypt Road Accident 30 Death Video: इजिप्तची राजधानी कैरो येथे एक अत्यंत भीषण रस्ते अपघात झाला असून, या दुर्घटनेत 30 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 20 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले. इंधनाने भरलेला टँकर महामार्गावर उलटल्यानंतर लागलेल्या भयंकर आगीत 25 पेक्षा जास्त वाहने जळून खाक झाली. या दुर्घटनेचे अंगावर काटा आणणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, संपूर्ण देशात शोककळा पसरली.
हा अपघात ग्रेटर कैरो परिसरातील गीझा प्रांताच्या दाट लोकवस्ती असलेल्या वर्राक भागातील रिंग रोडवर घडला. इजिप्तचे (Egypt) आरोग्य मंत्री खालिद अब्देल गफ्फार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशारा बोगद्याच्या वर असलेल्या व्यस्त महामार्गावर तेलाने भरलेला टँकर पहिल्यांदा दुभाजकाला धडकला आणि त्यानंतर थेट रस्त्याच्या मधोमध पलटी झाला. रस्त्यावर आदळताच टँकरमध्ये मोठा स्फोट झाला आणि बघता बघता आगीच्या ज्वाळांनी आसपासून जाणाऱ्या कार आणि दुचाकींना आपल्या विळख्यात घेतले.
घटनेची माहिती मिळताच विविध शहरांचे पोलीस दल आणि 35 हून अधिक रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अनेक तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर या महाभयंकर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. जखमींना तात्काळ जायेद स्पेशलाइज्ड हॉस्पिटल, इमबाबा जनरल हॉस्पिटल आणि वर्राक सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. आगीची तीव्रता इतकी जास्त होती की मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले असून, त्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसरात आणीबाणी जाहीर करुन नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि जवळच्या इमारतीही रिकाम्या करण्यात आल्या.
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल-सीसी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आरोग्य उपमंत्री मोहम्मद अल तैयब आणि अम्र कंदील यांनी घटनास्थळ तसेच रुग्णालयांना भेट देऊन जखमींच्या उपचारांचा आढावा घेतला. कैरोला अनेक शहरांशी जोडणाऱ्या या नेहमी गजबजलेल्या महामार्गावर झालेल्या या दुर्घटनेने इजिप्तमधील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.