Muhammad Yunus: बांगलादेशचे नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ डॉ.मुहम्मद युनूस यांना सोमवारी न्यायालयाने 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. युनूस यांच्या समर्थकांनी या घटनेचे वर्णन राजकीय हेतूने प्रेरित शिक्षा असे केले आहे. कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश शेख मरिना सुलताना यांनी निकाल देताना सांगितले की, त्यांच्याविरुद्ध कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. ग्रामीण टेलिकॉमचे अध्यक्ष म्हणून कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल युनूस यांना 6 महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात यावी, असा निर्णय न्यायमूर्तींनी दिला. युनूस यांच्यासह अन्य तीन जणांनाही न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान, निकाल जाहीर झाला तेव्हा 83 वर्षीय युनूस न्यायालयात उपस्थित होते. न्यायमूर्तींनी त्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. दंड न भरल्यास त्यांना आणखी 10 दिवस तुरुंगात घालवावे लागतील. बांग्लादेशी टाका हे बांगलादेशचे चलन असल्याचे ज्ञात आहे. युनूस आणि इतर तिघांनी निकाल लागताच जामिनासाठी अर्ज केला. पाच हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायमूर्तींनी त्यांना एक महिन्याचा जामीन मंजूर केला.
कायद्यानुसार, युनूस आणि इतर तिघे या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करु शकतात. याबाबत लवकरच न्यायालयात अपील दाखल केले जाऊ शकते, असे मानले जात आहे. ग्रामीण बँकेच्या माध्यमातून केलेल्या गरीबीविरोधी मोहिमेसाठी युनूस यांना 2006 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारशी त्यांचा वाद अज्ञात कारणांमुळे सुरु आहे. 2008 मध्ये हसीना सत्तेवर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी युनूस यांची अनेक प्रकरणांमध्ये चौकशी सुरु केली. त्यांच्या समर्थकांनी हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.