Afghanistan Iran Tensions: हेलमंड नदीच्या पाण्याच्या हक्कावरुन इराण आणि अफगाणिस्तान यांच्यातील वाद अधिक तीव्र झाला आहे. तालिबान आणि इराणच्या सुरक्षा दलांमध्ये झालेल्या गोळीबारानंतर शनिवारी तणाव वाढला.
इराणची अधिकृत वृत्तसंस्था 'IRNA' ने देशाचे उपपोलीस प्रमुख जनरल कासिम रजाई यांच्या हवाल्याने ही माहिती दिली.
इराणच्या सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांत आणि अफगाणिस्तानच्या निमरोझ प्रांताच्या सीमेवर तालिबान्यांनी शनिवारी सकाळी गोळीबार सुरु केला, असे त्यांनी सांगितले. वृत्तसंस्थेनुसार, गोळीबारात अनेक लोक जखमी झाले असून मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे.
वास्तविक, हेलमंड नदीचा विस्तार 1000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. पाण्याचा प्रवाह अफगाणिस्तानातून इराणच्या कोरड्या पूर्वेकडील प्रदेशांकडे आहे. तेहरानसाठी ही चिंतेची बाब बनली आहे, कारण काबूलने प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला आहे.
काबूलला आपल्या पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी आणि शेतजमिनीच्या सिंचनासाठी करायचा आहे. दुसरीकडे, इराणला गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईच्या वाढत्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
इराणच्या (Iran) हवामान संस्थेच्या मते, 2021 पर्यंत देशातील 97 टक्के भाग दुष्काळाचा सामना करत होता. याबाबत शेतकऱ्यांनी निदर्शने केली.
अफगाणिस्तानच्या (Afghanistan) गृह मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल नाफी तकोर यांनी इराणने पाण्याच्या वादातून गोळीबार सुरु केल्याचा आरोप केला. गोळीबारात दोन जण ठार झाले, एक अफगाणिस्तानचा आणि दुसरा इराणचा आहे.
गोळीबारात आणखी काही जण जखमी झाल्याचे तकोर यांनी सांगितले. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्याचवेळी, इराण सरकारने सांगितले की, गोळीबारात कोणताही इराण सुरक्षा कर्मचारी जखमी झाला नाही. तथापि, तेहरान टाईम्स या वृत्तपत्राने म्हटले आहे की, गोळीबारात 3 इराणी सीमा रक्षक मारले गेले आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी तालिबानला हेलमंड नदीवरील इराणच्या प्रादेशिक जल क्षेत्राचे उल्लंघन न करण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान, अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी हेलमंड नदीच्या पाण्याच्या हक्काबाबत चर्चा करण्यासाठी अफगाणिस्तानातील इराणच्या राजदूताची भेट घेतली. इराणने अधिकृतपणे तालिबान प्रशासनाला मान्यता दिलेली नाही.
मात्र, तेहरानने अफगाणिस्तानच्या नव्या शासकांशी संबंध कायम ठेवले आहेत. अनेक दशकांपासून, इराणने आपल्या युद्धग्रस्त देशात सशस्त्र संघर्षातून पळून आलेल्या लाखो अफगाण लोकांना शरण दिले आहे. 2021 पासून पश्चिमेकडे जाणाऱ्या अफगाणांच्या संख्येत वाढ झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.