Flood In Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसानंतर आलेल्या पुरात 33 जणांचा मृत्यू झाला असून 27 जण जखमी झाले आहेत. तालिबानचे प्रवक्ते अब्दुल्ला जनान सॅक यांनी सांगितले की, राजधानी काबूल आणि अनेक प्रांतांमध्ये अचानक पूर आला आणि त्यामुळे मोठे नुकसान झाले.
अब्दुल्ला जनान यांनी पुढे सांगितले की, पुरामुळे 600 हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली. त्याचबरोबर सुमारे 200 गुरे दगावली. पुरामुळे 800 हेक्टर शेतजमीनही उद्ध्वस्त झाली असून 85 किलोमीटरहून अधिक रस्त्यांचे नुकसान झाले आहे. जनान यांनी पुढे असेही सांगितले की, पुरामुळे पश्चिम फराह, हेरात, दक्षिणी झाबुल आणि कंदाहार प्रांतात सर्वाधिक नुकसान झाले आहे. सध्या अफगाणिस्तानात पावसापासून दिलासा मिळण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. येत्या काही दिवसांत अफगाणिस्तानातील 34 पैकी बहुतांश प्रांतांमध्ये आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
याआधीही अफगाणिस्तानातील नैसर्गिक आपत्तीत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये पूर्व अफगाणिस्तानात प्रचंड हिमवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात 25 जणांचा मृत्यू झाला होता. तर मार्चमधील तीन आठवड्यांच्या पावसात सुमारे 60 जणांचा मृत्यू झाला होता. संयुक्त राष्ट्राने गेल्या वर्षी असा इशारा दिला होता की, अफगाणिस्तानमध्ये हवामानात मोठे बदल होत आहेत. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानाचे स्वरुप बिघडत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.