Afghanistan: अफगाणिस्तानातील महिलांची स्थिती दयनीय आहे. अफगाण महिलांची स्थिती पूर्वीपासून फारशी चांगली नव्हती, पण जेव्हापासून तालिबानने सत्तेची सूत्रे हाती घेतली, तेव्हापासून महिलांची स्थिती अधिक दयनीय होत चालली आहे. तालिबान राजवटीने महिलांवर अनेक निर्बंध लादले आहेत. आता याच क्रमाने तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा याने महिलांविरोधात एक नवीन फर्मान जारी केला आहे. या फर्मानानुसार, पतीशिवाय इतर पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल दोषी आढळल्यास महिलेला दगडाने ठेचून ठार मारण्यात येईल.
दरम्यान, मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा याचा एक ऑडिओ मेसेजही समोर आला आहे. या ऑडिओ मेसेजमध्ये अखुंदजादाने पाश्चात्य देशांच्या लोकशाहीला आव्हान देत शरियाची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. अखुंदजादा म्हणाला की, 'तुम्ही म्हणता की आम्ही दगडाने ठेचून मारतो हे महिलांच्या हक्कांचे उल्लंघन आहे, पण लवकरच ही शिक्षा व्यभिचारासाठीही लागू केली जाईल. दोषी महिलांना सार्वजनिकरित्या दगडाने ठेचून मारण्यात येईल.'
अखुंदजादा पुढे म्हणाला की, ''पाश्चिमात्य देश ज्या अधिकारांबद्दल बोलत आहेत ते अधिकार महिलांना हवे आहेत का? असे सर्व अधिकार शरियत आणि मौलवींच्या मताच्या विरोधात आहेत. ज्या मौलवींनी पाश्चिमात्य लोकशाहीचा पाडाव केला. 20 वर्षे आम्ही पाश्चात्त्यांशी लढलो आणि गरज पडली तर पुढची 20 वर्षे लढत राहू.'' अखुंदजादा पुढे असेही म्हणाला की, ''आम्ही काबूल पुन्हा ताब्यात घेतल्यानंतर आमचे काम संपले नव्हते. आम्ही शांत बसणार नाही. अफगाणिस्तानात आम्ही शरियत परत आणू.''
दुसरीकडे, हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता घेतली तेव्हा त्यांनी महिलांच्या हक्कांचे उल्लंघन होणार नाही, असे आश्वासन दिले होते. असे असूनही अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे. मुलींच्या शालेय शिक्षणावर बंदी घालण्यात आली आहे. महिलांना बहुतांश नोकऱ्यांमधून काढून टाकण्यात आले किंवा त्यांच्या जागी त्यांच्या कुटुंबातील पुरुषाला नियुक्त केले गेले. महिलांनी ब्युटी पार्लरमध्ये जाणे, खेळ खेळणे अशा अनेक गोष्टींवर अफगाणिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
अफगाणिस्तानातील महिलांच्या स्थितीबाबत नुकताच संयुक्त राष्ट्राचा अहवाल समोर आला. या अहवालात महिला आणि मुलींना मनमानीपणे ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. तालिबानच्या राजवटीत तुरुंगात कैद असलेल्या महिलांचे शारीरिक शोषण होत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. अहवालात तालिबान राजवटीने महिलांच्या पोशाखावरील निर्बंध तात्काळ उठवावेत आणि मुलींना ताब्यात घेणे थांबवावे, अशी मागणी केली आहे.
अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर देशात शरिया कायदा लागू केला जाईल, असे तालिबानने म्हटले होते. इस्लामला मानणाऱ्या लोकांसाठी शरिया ही एक कायदेशीर व्यवस्था आहे. ही व्यवस्था सध्या अनेक इस्लामिक देशांमध्ये लागू आहे. मात्र, पाकिस्तानसह बहुतांश इस्लामिक देशांमध्ये त्याची पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. त्यात दैनंदिन जीवनापासून अनेक मोठ्या समस्यांवरील कायदे आहेत. शरियामध्ये कुटुंब, वित्त आणि व्यवसायाशी संबंधित कायदे देखील समाविष्ट आहेत. गुन्ह्यासाठी शिक्षेचे कठोर नियम आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.