पणजी: वर्षभर आपण ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो तो आपल्या लाडक्या बाप्पाचा सण म्हणजे गणेश चतुर्थी किंवा चवथ. आपल्या घरी बाप्पा दीड दिवसांसाठी आले आहेत की सात याचे आकर्षण नाही तर बाप्पाच्या येण्याने घरात निर्माण होणारा उत्साह गोवेकरांसाठी महत्वाचा असतो.
बाप्पांसाठी सर्वोत्तम मखर आणि सोबत साजेसा देखावा उभा करण्यासाठी साधारणपणे महिना-दोन महिन्यांपासूनच घराघरांमध्ये लगबग सुरु होते.
स्वयंपाक घरातून खोबरं भाजण्याचा वास आला की समजायचं चतुर्थीचा दिवस जवळ आला आहे, कारण प्रत्येक गोवेकरासाठी करंज्या (नेवऱ्या) आणि मोदकांशिवाय चतुर्थीचा सण अपूर्णच आहे. गोवा आणि चतुर्थी यांचा अनोखा संगम नेमका कसा आहे, हे जाणून घेऊया...
सर्व विघ्नांचे हरण करणारा विघनविनाशक आपल्या घरी येणार या भावनेनेच घरात चतुर्थीच्या तयारीला जोर येतो. प्रत्येक घरात माटोळीची जागा ठरलेली असतेच, आणि चतुर्थीच्या आदल्यादिवशी बागायतीमधून केळ्यांचा भलामोठा घड, नारळ, सुपाऱ्या, आंब्याची पानं (ताळे) आणि अनेकविध फळांनी ही माटोळी सजवली जाते.
याचे महत्व काय, तर ज्या निसर्गावर आपण आजन्म अवलंबून असतो त्या निसर्गाला मनाचे स्थान देणे, त्याच्या विषयी कृतन्यता व्यक्त करणे होय.
जुन्या काळात माणसं काही गर्भश्रीमंत नसायची, मात्र बाप्पा घरी येणार म्हणजे काही सजावट तर केलीच पाहिजे या शुद्ध भावनेतून माटोळीचा उगम होतो. मात्र आजच्या घडीला माटोळी बांधणे ही केवळ एक परंपरा किंवा प्रथा राहिलेली नसून अनेक तरुण कलेचे प्रदर्शन करण्याचा एका मार्ग म्हणून माटोळी सजवतात.
गोव्यातील घरांमध्ये चतुर्थीच्या काळात डोकावून पाहिल्यास विठ्ठल, श्रीगणेश, शंकरची पिंडी अशा अनेकविध कलाकृती केवळ पानाफळांच्या साहायाने साकार केलेल्या दिसतात.
अंगणात असलेल्या तुळशी वृन्दावनासमोर देखील छोटीशी माटोळी उभारलेली पहायला मिळते, जोपर्यंत घरात बाप्पा विराजमान आहेत तोपर्यंत ही माटोळी कायम राहते.
गोव्यात पिढ्यानपिढ्या जपल्या गेलेल्या या अनोख्या परंपरेमुळेच माटोळी म्हटलं की गोवा हे नाव आपोआप मनात उमटतं. एका अर्थाने माटोळी ही गोव्यातील चतुर्थीची ओळख बनली आहे.
यंदा ७ सप्टेंबर म्हणजे शनिवारी देशभारात चतुर्थीचा उत्सव साजरा केला जाणार आहे आणि पुढे अनंतचतुर्दशीपर्यंत हा उत्सव सुरु राहील. चतुर्थीच्या दिवसापासून दीड, पाच, सात, नऊ अशा विविध दिवसांमध्ये गणरायाची सागरसंगीत उपासना केली जाईल.
भाद्रपद शुल्क चतुर्थीच्या दिवशी अमुक एका वेळेलाच गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जावी असा काही नियम नसला तरीही सकाळी ४:५० ते दुपारी १:५१ पर्यंतच्या काळात पूजेचा शुभारंभ केला जाऊ शकतो.
ब्राम्हण कुटुंबांमध्ये साधारणतः हरितालिका तृतीयेपासूनच या सणाचा प्रारंभ होतो तर बाकी घरांमध्ये चतुर्थीच्या दिवशी शिव आणि गौरीची आराधना केली जाते. पुढे गणपतीला लाडू-मोदकांचा नैवेद्य दाखवून आजूबाजूला पुजलेल्या बाप्पाच्या भेटीगाठी सुरु होतात.
चतुर्थी आणि पुढील काही दिवसांची संध्याकाळ ही घुमट आरतीच्या सुरात भरून जाते. गावातील प्रत्येकाच्या घरात भेट देत हे वादकवृंद आरतीच्या माध्यमातून विघ्नांतकाची उपासना करतात.
गोव्यातील चतुर्थी म्हटलं की माटोळीप्रमाणेच ती सार्वजनिक गणपतीशिवाय देखील तेवढीच अपूर्ण आहे. विविध बस स्थानक, पोलिस चौक्या आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विधिवत चतुर्भुज गणपतीची पूजा केली जाते.
गोवेकरांमध्ये या सार्वजनिक गणपतीची आकर्षण का? याचे प्रामाणिक उत्तर बाजूला उभा देखावा असेच आहे. चतुर्थीचे उद्दिष्ट साधून पौराणिक कथा किंवा समाजातील एखादा महत्वाचा किस्सा सांगणारा भव्य-दिव्य फिरत देखावा उभारला जातो. लहान मुलांमध्ये या देखाव्यांचे विशेष आकर्षण असल्याचे दिसून आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.