

सांख्यिकी मंत्रालयाच्या Periodic Labour Force Survey (PLFS) अहवालानुसार, 2025 मध्ये सर्व तीन प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये महिलांच्या वेतनवाढीचा वेग पुरुषांपेक्षा जास्त होता. हा अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला.
माहितीनुसार, 2025 मध्ये महिलांच्या उत्पन्नात वेतनधारक नोकऱ्यांमध्ये 7.2%, स्वयंरोजगारात 8.8% आणि कॅज्युअल मजुरीत 5.4% वाढ झाली, जी 2024 च्या तुलनेत जास्त आहे. त्याचवेळी पुरुषांच्या उत्पन्नात वेतनधारक नोकऱ्यांमध्ये 5.8% आणि स्वयंरोजगारात 8% वाढ झाली, मात्र कॅज्युअल मजुरीत 0.2% घट झाली.
तथापि, महिलांचे उत्पन्न अजूनही पुरुषांच्या तुलनेत कमीच आहे. 2025 मध्ये वेतनधारक नोकऱ्यांमध्ये महिलांना पुरुषांच्या उत्पन्नाच्या केवळ 76% इतकेच वेतन मिळाले, जे 2022 च्या तुलनेत फारसे बदललेले नाही.
कॅज्युअल मजुरीत मात्र काही प्रमाणात सुधारणा दिसून आली असून, महिलांना पुरुषांच्या उत्पन्नाच्या 69% इतके उत्पन्न मिळाले, जे 2024 मधील 66% पेक्षा जास्त आहे.
स्वयंरोजगाराच्या बाबतीत महिलांची स्थिती सर्वात कमकुवत असून, त्या पुरुषांच्या उत्पन्नाच्या केवळ 36% इतकेच कमावतात, असे PLFS च्या आकडेवारीत नमूद आहे. दरम्यान, सकारात्मक बाब म्हणजे वेतनधारक नोकऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग 2024 मधील 16.6% वरून 2025 मध्ये 18.2% पर्यंत वाढला आहे.
स्वयंरोजगारातील महिलांचे प्रमाण 66.5% वरून 64.2% पर्यंत कमी झाले, तर कॅज्युअल मजुरीतील महिलांचे प्रमाण 16.9% वरून 17.6% झाले. पुरुषांसाठीही हा कल जवळपास असाच राहिला.
देशपातळीवर पाहता, वेतनधारक नोकऱ्यांचे प्रमाण 2024 मधील 22.4% वरून 2025 मध्ये 23.6% पर्यंत वाढले आहे. वेतनधारक नोकऱ्या अधिक गुणवत्तापूर्ण रोजगाराचे प्रतीक मानल्या जातात, कारण त्यात सामाजिक सुरक्षा आणि इतर लाभ मिळतात.
याच पार्श्वभूमीवर Ministry of Statistics and Programme Implementation (MoSPI) च्या Annual Survey of Unincorporated Sector Enterprises (ASUSE) अहवालात नमूद केले आहे की 2025 मध्ये भारताच्या अनौपचारिक क्षेत्रातील वेतनवाढ केवळ 3.9% इतकी होती, जी 2023-24 मधील 13% वाढीच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्याचवेळी नवीन उद्योगसंस्थांची वाढही कमी झाली, ज्यामुळे रोजगारनिर्मितीवर परिणाम झाला.
रोजगाराच्या आकडेवारीनुसार, ग्रामीण बेरोजगारी दर 2024 मधील 2.5% वरून 2025 मध्ये 2.4% पर्यंत घसरला, तर शहरी बेरोजगारी 5% वरून 4.8% झाली.
मात्र ग्रामीण कामगार सहभाग दर (LFPR) किंचित घटून 62.8% झाला, म्हणजेच कमी लोक नोकरीच्या शोधात होते. शहरी भागात LFPR 52.2% वर स्थिर राहिला.
तरुणांमधील (15-29 वर्षे) बेरोजगारी दर 2024 मधील 10.3% वरून 2025 मध्ये 9.9% झाला, मात्र तरुण महिलांमध्ये हा दर 11.1% वरून 11.3% पर्यंत किंचित वाढला.
सांख्यिकी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये देशात 15 वर्षांवरील सरासरी 61.6 कोटी लोक रोजगारात होते. यापैकी 41.6 कोटी पुरुष आणि 20 कोटी महिला होत्या.
‘Usual Status (ps+ss)’ ही पद्धत कामगारांच्या रोजगारस्थितीचे मोजमाप करण्यासाठी वापरली जाते. यात मागील 365 दिवसांतील प्रमुख (Principal Status) आणि पूरक (Subsidiary Status) रोजगाराचा विचार केला जातो. म्हणजेच, जे लोक दीर्घकाळ काम करत होते किंवा कामासाठी उपलब्ध होते, तसेच ज्यांनी किमान 30 दिवस काम केले होते, त्यांचा यात समावेश केला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.