Gurugram Women locked herself: हरियाणातील गुरुग्राममध्ये एक महिला तिच्या दहा वर्षाच्या मुलांसह गेल्या तीन वर्षांपासून एका खोलीत कैद असल्याचे आढळून आले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे महिलेने स्वत:ला आणि मुलाला कैद केले होते.
तिच्या पतीने पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी दोघांचीही सुटका केली. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
महिलेच्या पतीने जिल्हा प्रशासनाला माहिती दिली. यानंतर मंगळवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाच्या पथकाने मानसिकदृष्ट्या त्रासलेल्या या आई आणि तिच्या मुलाची सुटका केली.
या महिलेने जेव्हा कोंडून घेतले होते तेव्हा तिचे मुल सात वर्षांचे होते. सध्या मुलाचे वय 10 वर्षे असून त्याची आई 40 वर्षांची आहे. तेव्हापासून मुलाला आणि त्याच्या आईला सूर्याची किरणे दिसली नाहीत. अधिकाऱ्यांनी बालक आणि आई दोघांनाही रुग्णालयात दाखल केले आहे. तीन वर्षांपासून त्यांच्या खोलीत साचलेला कचरा पाहून अधिकारी चक्रावले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या पतीने पत्नी मानसिक आजारी असल्याची माहिती दिली होती. तिने आपल्या 10 वर्षाच्या मुलाला 3 वर्षांपासून खोलीत डांबून ठेवले आहे. पोलिसांनी बालकल्याण पथकासह मंगळवारी दुपारी चाकरपूर परिसरात पोहोचून निष्पाप मुलगा व त्याच्या आईची सुटका करून त्यांना रुग्णालयात दाखल केले.
गुरुग्रामचे सीएमओ वीरेंद्र यादव यांनी सांगितले की, कोविडच्या भीतीमुळे आई आणि तिच्या दहा वर्षांच्या मुलाने तीन वर्षांपासून सूर्यप्रकाशही पाहिलेला नाही. तीन वर्षांपासून साचलेला कचरा त्यांच्या खोलीत विखुरलेला होता. बाहेर आल्यावर तिला कोविड होईल याची भीती अजूनही त्या महिलेला वाटत होती.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत या कुटुंबाने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले, पण दुसऱ्या लाटेपूर्वी पती कामावर जाण्यासाठी बाहेर गेल्यावर महिलेने पतीलाही घरात प्रवेश बंदी केली. तिला भीती होती की तिचा नवरा बाहेरून येऊन कोरोनाची लागण होऊ नये आणि तिलाही संसर्ग होऊ नये. यानंतर महिलेचा पती गेल्या दीड वर्षांपासून चाकरपूर येथे भाड्याच्या खोलीत राहत होता.
पत्नीच्या वागण्यावरून ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे पतीला समजले होते. तो पोलिसांकडे गेला, मात्र पोलिसांनी ही घरगुती बाब असल्याचे सांगून कोणतीही चौकशी केली नाही. पतीने रविवारी पुन्हा चाकरपूर चौकी गाठली. पोलिसांनी त्याचे म्हणणे ऐकून घेतले. पीडीत मुलाशी व्हिडिओ कॉलवर बोलल्यावर पोलिसही चक्रावून गेले.
पोलीस कर्मचारी चाकरपूर येथील घरी गेल्यावर संबंधित महिलेने दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न केल्यास मुलाला मारून टाकू, अशी धमकी दिली. त्यानंतर बालकल्याणच्या पथकासह घटनास्थळी पोहोचून दोघांची सुटका करण्यात आली.
तीन वर्षे इंडक्शनवर स्वयंपाक
या महिलेने घरातील सिलिंडर संपल्यावर इंडक्शनवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली. तीन वर्षे तिने स्वतःसाठी आणि मुलासाठी असाच स्वयंपाक केला. सध्या ही आई आणि मुलगा डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांच्या प्रकृतीच्या चाचण्या केल्या जात आहेत. महिलेचा पती तिला पैसे आणि वाणसामान आणून देत होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.