Rishikesh Bus Accident: प्रवाशांचा आक्रोश अन् चक्काचूर बस! ऋषिकेशजवळ 100 फूट खोल दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू; क्रेनच्या मदतीनं जखमींना काढलं बाहेर VIDEO

Rishikesh Bus Accident News: उत्तराखंडमधील ऋषिकेशजवळील गुलर बाजार परिसरात आज (17 नोव्हेंबर) सकाळी भीषण अपघात घडला, ज्यामध्ये 8 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.
Rishikesh Bus Accident News
Rishikesh Bus AccidentDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Rishikesh Bus Accident News: उत्तराखंडमधील ऋषिकेशजवळील गुलर बाजार परिसरात आज (17 नोव्हेंबर) सकाळी भीषण अपघात घडला, ज्यामध्ये 8 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. 25 प्रवाशांनी भरलेली ही बस थेट शंभर फूट खोल दरीत कोसळली. टिहरी जिल्ह्यातील मुनी की रेती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हरिद्वारहून बद्रीनाथच्या दिशेने जाणाऱ्या या बसचे नियंत्रण सुटल्याने ती पुलावरुन थेट खाली कोसळली, ज्यामुळे बसचा पुढचा भाग चक्काचूर झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरु केले, तर ब्यासी आणि ढालवाला पोस्टवरुन एसडीआरएफ, पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. एसडीआरएफचे सेनानायक अर्पण यदुवंशी यांच्या नेतृत्वाखाली युद्धपातळीवर बचाव कार्य राबवण्यात आले. या अपघातात 20 हून अधिक प्रवाशांना गंभीर अवस्थेत बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींना क्रेनच्या मदतीने सुरक्षित वर काढण्यात आले.

हा भीषण अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबतचे कारण शोधण्याचे काम सुरु असून पोलिसांनी बस जप्त केली. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी तात्काळ घटनेची माहिती घेतली आणि प्रशासनाला तातडीने मदत व बचाव कार्य तीव्र करण्याचे निर्देश दिले. तसेच, या संपूर्ण अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देत लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगितले. या दुर्देवी घटनेमुळे देवभूमी उत्तराखंडमध्ये हळहळ व्यक्त होत असून, बद्रीनाथ यात्रेला निघालेल्या भाविकांवर आलेल्या या संकटामुळे सर्वत्र शोककळा पसरली. प्रशासनाकडून जखमींवर उत्तम उपचार व्हावेत यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.