गड-किल्ले, कोरीव मंदिरे आणि व्याघ्रदर्शन: मध्य प्रदेशातील एका समृद्ध सफरीची गाथा

Madhya Pradesh Tourism: ग्वाल्हेर, दतिया, झाशी, ओरछा, खजुराहो आणि पन्ना हे आम्ही वर्तमानकाळी पूर्ण केलेले इतिहासाचे एक आवर्तन होते. मन लावून ऐकलेली ती काळाच्या पाऊलखुणांची सुरावट होती.
Tourism
TourismDainik Gomantak
Published on
Updated on

ठरवून प्रवास घडतो, त्यापेक्षाही कधी कधी अजिबात न योजलेला, अकस्मात घडलेला प्रवास खूप काही देऊन जातो. वास्तविक मला ‘स्पिती व्हॅली’च्या खडतर रस्त्यांवरून फिरायचे होते. तयारीही तशीच केली होती. पण हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आणि बिघडलेले हवामान पाहून मला निर्णय बदलावा लागला. मन खट्टू झाले.

ठरवलेले सगळे रद्द करून पुन्हा नव्याने सगळे आखावे लागले. पण, तोच पवास पुढे जाऊन माझ्या आयुष्यातील अत्यंत संस्मरणीय प्रवासांपैकी एक ठरेल, असे तेव्हा वाटले नव्हते. इतिहास, स्थापत्यकला आणि अरण्यसृष्टीने ओथंबलेला हा प्रवास माझे मन:पटल आजही चिंब भिजवतो.

आम्ही सहा जण जाणार होतो, पण वैद्यकीय कारणांमुळे शेवटी आम्ही चौघी महिलाच उरलो. सगळ्यांमध्ये उत्सुकता आणि भारताच्या इतिहासाविषयी कमालीचा आदर होता. हा मार्ग मी मुद्दाम निवडला, कारण यात राजेशाही वैभव, मंदिरांचे आध्यात्मिक सूर आणि वनातले निसर्ग संगीत यांची सुरेख गुंफण यात होती.

Tourism
Goa Crime: नुवे घरफोडीत 'पारधी गँग'चा हात, मायणा कुडतरी पोलिसांनी मुंबईत आवळल्या एकाच्या मुसक्या

ग्वाल्हेर : सूर्यास्तात उजळणारा इतिहास

आम्ही ग्वाल्हेरला उतरून थेट ग्वाल्हेर किल्ल्याकडे निघालो. तटबंदीचा काही भाग नुकताच कोसळला होता आणि तो निसरडा होता, तरीही त्या जागेचे तेज कमी झाले नव्हते. त्या प्राचीन दगडांवर उभे राहून निळ्या फरशांनी मढवलेल्या भिंतींवर होणारा देखणा सूर्यास्त केवळ अविस्मरणीय होता. माणसाच्या आयुष्याचा अस्तही असाच देखणा असावा, असे क्षणभर वाटले. त्या भिंतींनी तुर्क, मुघल, शिंदे आणि कितीतरी विस्मृतीत गेलेल्या शासनकर्त्यांचा इतिहास पाहिला आहे. भग्न, जखमी असूनही त्या आजही अभिमानाने उभ्या आहेत.

‘साउंड ऍन्ड लाइट शो’ तर मन मोहून टाकणारा होता. किल्ल्याचा इतिहास प्रत्येक राजघराणी उलगडत शेवटी शिंद्यांपर्यंत येऊन थांबतो. हवामान सुंदर होते, वातावरण जादुई होते आणि त्या ४५ मिनिटांत मी अक्षरशः भूतकाळात पोहोचल्यासारखी वाटले. रात्री ‘तानसेन रेसिडेन्सी’मध्ये गझलांचा कार्यक्रम झाला. आधीच यथासांग भारावलेल्या दिवसाची ती शांत, सुरेल, भारलेली सांगता होती.

दुसऱ्या दिवशी फिरताना लाभलेला गाईड अत्यंत जाणकार आणि अभ्यासू होता. त्याने आम्हाला किल्ला, तानसेनची समाधी आणि शिंदे पॅलेस दाखवला. किल्ल्यातील प्रत्येक कोपरा आम्ही बारकाईने पाहिला. राजवाड्याचा खास तांबूस-निळा रंग कसा वापरला गेला हे त्याने सांगितले. इतकी झीज सोसूनही त्या सजावटी आजही चकाकतात.

जाळीकाम, नक्षीकाम इतके सूक्ष्म आहे, की थक्क व्हायला होते. भिंतींवर पूर्वी मौल्यवान रत्ने जडवलेली होती. त्यांना उखडून, लुटून नेल्यानंतर ती रिकामी कोंदणे पाहताना काळजात चर्र झाले. इतिहासातल्या या रिकाम्या जागाच, जे नष्ट केले ते किती भव्य होते याची साक्ष देतात. यानंतर आलेला ईस्ट इंडिया कंपनीचा काळ हा सर्वांत काळा अध्याय. दागिने, अवशेष, ताईत आणि भारताचे वैभवच जणू त्यांनी लुटून नेले. जे शिल्लक होते त्याचे ओझे त्या शांत दालनांत उभे राहिल्यावर आमच्याने उचलेना.

शिंदे पॅलेसची भव्यता तर अनिर्वचनीय आहे. बेल्जियममधील झुंबर, त्यातले दोन तर ३.५ टन वजनाचे, जेवणाच्या टेबलाभोवती पेये नेणारी छोटी रेल्वे, चांदीची भांडी, ऐश्वर्यशाली खोल्या - सगळेच भारावून टाकणारे.

दिवस संपता संपता ‘बडा बाजार’ येथे फिरलो. इंडो-इस्लामिक आणि फ्रेंच स्थापत्याचा सुंदर संगम येथे दिसतो. टाउन हॉल आणि जुने पोस्ट ऑफिस सांस्कृतिक वारशाची आठवण करून देतात. ग्वाल्हेर गुलाबजाम, लाडू आणि कचोरींसाठी प्रसिद्ध आहे. ‘बहादुर स्वीट्स’ला भेट दिल्यावर ग्वाल्हेरच्या सहलीची आठवणीत रेंगाळत राहते. इथे मधुमेहींनाही मधुमोह आवरत नाही.

Tourism
Goa Road Safety: रस्ता सुरक्षा; नुवे येथे 'कार्मेल'च्या विद्यार्थिनींकडून जनजागृती मोहीम

दतिया पॅलेस : विस्मरणात गेलेले वैभव

ओरछाकडे जाताना आम्ही दतिया पॅलेसला थांबलो. बहुतांश प्रवासी हे ठिकाण वगळतात. जहांगीरच्या छोट्या भेटीसाठी बांधलेला हा राजवाडा पूर्ण व्हायला दहा वर्षे लागली. विशाल अंगण, रचना आणि काहीसे दुर्लक्षित पण भारावून टाकणारे वैभव आजही उभे आहे.

झाशी : रणरागिणीची भूमी

झाशी किल्ल्यावर थोडा विसावा घेतला. राणी लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाने ही भूमी कायमची पवित्र झाली आहे. प्रत्येकाची कथा थोडी वेगळी असली तरी तिच्या धैर्याची आठवण आजही इथल्या भिंतींमध्ये जिवंत आहे.

ओरछा : प्रेम आणि राजेशाहीचा कालकोष

बेतवा नदीकाठी वसलेले ओरछा म्हणजे जणू एखादा काळात अडकलेला स्वप्नलोकच! शिकारीदरम्यान राजाने हे ठिकाण शोधले आणि का निवडले ते लगेच कळते; जंगल, नदी, सुपीक जमीन आणि नैसर्गिक संरक्षण. इथला ‘साउंड ऍन्ड लाईट शो’ फक्त आवाज आणि प्रकाशावर आधारित असला तरी अत्यंत भावस्पर्शी होता. आम्ही ‘एमपी टुरिझम’मध्ये राहिलो आणि ‘अमर महाल पॅलेस’मध्ये जेवलो. नवाबी, हिंदू आणि युरोपीय शैलींचे ते मिश्रण अप्रतिम होते. राम राजा मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर आणि राजवाडा संकुल पाहिले. ओरछा हळूहळू मनात झिरपत जातो.

खजुराहो : कामुकतेपलीकडचे जीवनदर्शन

खजुराहो म्हणजे फक्त शिल्पातील कामुकता नाही. फक्त १०-१५% शिल्पे तशी आहेत. उरलेली जीवन, देव, नृत्य, संगीत आणि निसर्ग समजावतात. संभोग ते समाधी असा संदेश देणारी कामुक शिल्पे ही तांत्रिक, आध्यात्मिक आहेत,

तृतीयपंथ ओळख, स्त्रीदेहाचा सन्मान, आनंदाची समानता हे मूर्तींत पाहिल्यावर तेव्हाचे लोक लैंगिकतेबाबत किती प्रगत होते हे जाणवते. आज आपण विनाकारण संकोचतो; पण आपले पूर्वज उघडपणे या विषयावर चर्चा करत होते. खजुराहोचे ‘ट्रायबल म्युझियम’ही अतिशय सुंदर आहे.

पन्ना टायगर रिझर्व्ह : प्रवासाचा मुकुटमणी

खजुराहोपासून पन्नाला गेलो. सकाळी हवेत असलेला बोचरा गारवा जंगलात प्रवेश करण्याचा थरार अनुभवताना कुठल्या कुठे नाहीसा झाला. पहिल्या सफारीत आमच्या जिप्सीसमोरून बिबट्या चालत गेला; हा अनुभव तर अत्यंत दुर्मीळ. गिधाडे आणि फाल्कनही पाहायला मिळाले.

दुसऱ्या सफारीत वाघीण आणि तिची दोन पिल्ले बागडताना दिसली. तिसऱ्या सफारीत तर स्वप्नपूर्ती झाली; नर वाघ, वाघीण आणि तीन पिल्ले असे पाच जणांचे कुटुंब दृष्टीस पडले. आम्ही माणसे गमावत असलेली कुटुंबवत्सलता त्या व्याघ्र कुटुंबाने दाखवावी, हा निसर्गाने आम्हाला निरोप देताना हाती दिलेली शिदोरी होती.

ही शिदोरी सोबत घेऊन खजुराहोहून ‘वंदे भारत’ने ग्वाल्हेरला पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी घरी परतलो. मन, कॅमेरे आणि भाविविश्‍व सगळे भरलेले होते! ग्वाल्हेर, दतिया, झाशी, ओरछा, खजुराहो आणि पन्ना हे आम्ही वर्तमानकाळी पूर्ण केलेले इतिहासाचे एक आवर्तन होते. मन लावून ऐकलेली ती काळाच्या पाऊलखुणांची सुरावट होती. प्रत्येक ठिकाणाचा स्वतःचा सूर होता. हवा तितकाच आणि नेमका तिथेच लागलेला!

डॉ. बबिता आंगले प्रभुदेसाई (लेखिका कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट आहेत.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com