नवी दिल्ली,
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ होणार आहे. केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यावेळी उपस्थित राहतील. या कार्यक्रमात, गृहमंत्र्यांच्या हस्ते सहा निसर्ग उद्याने /पर्यटन स्थळांचा कोनशिला समारंभ होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एकाच वेळी 38 जिल्ह्यातील 10 कोळसा/दगडी कोळसा खाणी परिसरातील 130 स्थळी हे वृक्षारोपण होणार आहे.
कोळसा मंत्रालयाने आयोजित केलेल्या या वृक्षारोपण अभियानात सर्व कोळसा/दगडी कोळशाच्या सार्वजनिक खाणींना सहभागी करुन घेण्यात आले आहे. या दरम्यान खाणक्षेत्र,वसाहती, कार्यालयीन परिसर आणि खाण क्षेत्रातील इतर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाईल. तसेच आजूबाजूच्या परीसारतील लोकांना बियाणांचे वाटप करुन त्यांनाही वृक्षारोपणासाठी प्रोत्साहित केले जाईल.
निसर्ग उद्याने/ पर्यटन स्थळे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांसाठी मनोरंजन, साहसी खेळ, वॉटर स्पोर्ट्स, पक्षी निरीक्षण इत्यादीसाठीची केंद्रे बनतील. तसेच ही निसर्ग उद्याने पर्यटन परिक्रमेचाही भाग बनू शकतील. या क्षेत्रांच्या संवर्धनासाठी निधी उभारणे आणि स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने ही पर्यटन स्थळे विकसित केली जाणार आहेत.
हरित सृष्टीची निर्मिती हा कोळसा क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचा विषय असून, या अंतर्गत, बंद झालेल्या खाणपरिसरात आणि खाणीतून निघालेला कचरा जमा करण्यात आलेल्या जागांवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन अधिकाधिक हरितक्षेत्र निर्माण केले जाणार आहे. त्याशिवाय खाणींच्या सभोवताली आणि जिथे शक्य आहे, अशा सर्व परिसरात वृक्षारोपण केले जाईल. हरित सृष्टी निर्मितीच्या या उपक्रमाची सुरुवात, कोळसा/दगडी कोळसा खाणी, तसेच खाजगी खाण क्षेत्राच्याही सक्रीय सहभागातून होईल. यावर्षी, तीन कोळसा/दगडी कोळशाच्या सार्वजनिक खाणी, कोल इंडिया लिमिटेड, NLC इंडिया लिमिटेड आणि सिंगारेनी कोलरीज कंपनी लिमिटेड यांनी 1789 हेक्टर परिसरात हरित क्षेत्र उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
संपादन - तेजश्री कुंभार
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.