

Udhayanidhi Stalin Arrested: तामिळनाडूमधून एक मोठी राजकीय बातमी समोर आली. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री तृषा कृष्णन हिच्याविरोधात केलेल्या एका आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
आपल्या अटकेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनिधी स्टॅलिन यांनी, “आम्ही या कायदेशीर लढाईचा खंबीरपणे सामना करु,” असे स्पष्ट केले. तसेच ही कारवाई म्हणजे एक निव्वळ ड्रामा असून 'डीएमके'चा कोणताही कार्यकर्ता अशा पोलिसी कारवाईला घाबरत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. सोमवारच्या रॅलीनंतर या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते.
हे संपूर्ण वादाचे वादळ सोमवारी तंजावर येथे आयोजित एका विरोध निदर्शना दरम्यान सुरु झाले. उदयनिधी स्टॅलिन व्यासपीठावरुन उपस्थितांना संबोधित करत असताना, अचानक टोळक्यामधील काही लोकांनी अभिनेत्री तृषाचे नाव घेऊन घोषणाबाजी सुरु केली. यावर उदयनिधी यांनी आपले भाषण थांबवून एक डबल मिनिंग आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली. या वक्तव्याचा व्हिडिओ समोर येताच राजकीय वर्तुळातून जोरदार विरोधाचे सूर उमटू लागले. एका मोठ्या जबाबदार राजकीय व्यासपीठावरुन अशा प्रकारची अश्लील भाषा वापरणे म्हणजे महिलांचा थेट अपमान आहे आणि यामुळे सार्वजनिक ठिकाणी महिला छेडछाडीला खतपाणी मिळते, असा गंभीर आरोप विरोधी पक्षांनी त्यांच्यावर केला.
अभिनेत्रीवरील या वादग्रस्त टिप्पणीनंतर 'टीव्हीके' (TVK) पक्षाने उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत टीका केली. त्यांनी उदयनिधींना नाव बदलण्याचा सल्ला देत, या संपूर्ण प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोग आणि पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली. कोणत्याही राजकीय सूडबुद्धीने ही तक्रार केली नसून, केवळ एका स्त्रीच्या सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी ही कायदेशीर पावले उचलल्याचे टीव्हीके पक्षाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. या हाय-प्रोफाइल अटकेनंतर तामिळनाडूतील (Tamil Nadu) राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.